Saturday, November 9, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखकोकणात विधानसभा निवडणुुकीची धामधूम

कोकणात विधानसभा निवडणुुकीची धामधूम

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होतील असा अंदाज वर्तविला जातोय. २६ नोव्हेंबर रोजी राज्यात नवीन सरकार अस्तित्वात येईल असं म्हटलं जातंय. खरंतर सध्याच्या स्थितीत पावसाचा अंदाज वर्तवणे अवघड ठरते. तसा निवडणुकांचा प्रत्यक्ष कार्यक्रम जाहीर होईपर्यंत आपण अंदाज बांधण्यात काही हरकत नाही. नाही तरी कोकणामध्ये जगभरातील राजकीय, सामाजिक घडामोडी आणि त्यावरच्या गजालीमध्ये कमालीचे स्वारस्य रहाते. तर निवडणुका महाराष्ट्रात कधी व्हायच्या तेव्हा होवोत; परंतु गेले सहा महिने राज्यातील राजकारण ढवळून निघत आहे. राज्यातील अनेक प्रश्न एेरणीवर आणून त्यावर चर्चा कशापद्धतीने घडविता येईल. आगामी निवडणुकांसाठी मतांची ‘बेगमी’ कशापद्धतीने करता येईल याची आखणीच सध्या सुरू आहे.

माझे कोकण – संतोष वायंगणकर

राजकीय पक्षांनी स्वत:ची मूळ विचारधारा बाजूला सारत मतांची बेरीज आपल्यासोबत राहण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणातील पाचही तालुक्यांत महायुतीला चांगले यश मिळवता आले. कोकणात महाविकास आघाडीची एकही जागा निवडून येऊ शकली नाही. ज्या ठाकरे सेनेचा बेस कोकण होता, त्या कोकणातच त्यांना हार पत्करावी लागली. लोकसभा निवडणुकीतून विधानसभेचं जागा वाटपाचं सूत्र निश्चित होऊ शकेल असा कौल खरंतर जनतेने दिला आहे. अर्थात लोकसभा निवडणूक निकाल आणि विधानसभेतील निवडणुकीची मोर्चेबांधणी वेगळ्या पद्धतीने असणार आहे. लोकसभा निवडणुकीत नकारात्मक मुद्द्यांवर महाविकास आघाडीने प्रचार यंत्रणांमध्ये वापर करूनही त्याचा परिणाम कोकणामध्ये झालेला नाही. अॅड. असिम सरोदे, विश्वंभर चौधरी यांनी संविधान धोक्यातचा नारा देत महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करण्यासाठीचा विचारसभा, समारंभ, चर्चा यातून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. संविधान बचावचा नरेटिव अशा काही पद्धतीने मांडला आणि पसरवला गेला की अवती-भवतीच्या या बचाव कार्यकर्त्यांच्या वक्तव्यांनी कुणाचाही सहज विश्वास बसावा अशा पद्धतीने ही निवडणुकीसाठीची मांडणी होती. हे देखील स्पष्ट झाले. संविधान कसे धोक्यात आहे हे सांगणारी काही माध्यमातील ज्येष्ठांनीही यानिमित्ताने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी जवळीक वाढविण्यासाठीही ‘संविधान बचाव’चे माध्यम शोधले व प्रयत्नही केले. लोकसभा निवडणुका पार पडल्या आणि संविधान बचावची महाराष्ट्रभर जागर करणारे विविध क्षेत्रातील तथाकथित स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे आहोत असा समज करून घेणारे सारेच कुठे दिसेनाचे झाले. महाराष्ट्रातील जनतेलाही या समाजकार्यकर्ते म्हणवून घेणाऱ्यांची बेगडी जनजागृती यानिमित्ताने लोकांसमोर आली. या नरेटिवचा प्रचार कोकणात प्रभाव पाडू शकला नाही. हे जनतेने निवडणूक निकालाने दाखवूनही दिले.

विधानसभा निवडणुकीत एक नवीन ‘भूत’ महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणले जाईल, यात शंकाच नको. जनतेला विकास हवा असतो. कोकणालाही विकासाची आस आहे. आजवर प्रत्येक निवडणुकीत एखाद्या प्रकल्पाच्या नावाने विरोध दाखवायचा, वातावरण निर्मिती करायची, जनतेचा बुद्धिभेद करायचा हेच आजवर करण्यात आले आहे. निवडणुका आल्या की, जनतेच्या प्रश्नांचा फार कळवळा येतो. जनतेचे तारणहार आपणच आहोत, याच गैरसमजात तथाकथित त्या-त्या भागातील नेते पुढारी यांचा वावर असतो ते आपपापल्या पद्धतीने प्रयत्न करत असतात. विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे शिवसेना यांच्यामध्ये कोकणचा विचार करता जागा वाटपाचा तिढा आजही कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड-वैभववाडी-कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपाचे विद्यमान आमदार नितेश राणे यांच्याविरोधात काँग्रेस पक्ष कोणाला उमेदवार देणार? की ही जागा ठाकरे सेना लढवणार असे आजही प्रश्न कायम आहेत. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात ठाकरे सेनेचे आ.वैभव नाईक यांनाच ठाकरे सेना उमेदवारी देणार की, माजी खासदार विनायक राऊत यांची कन्या निवडणूक लढवणार. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात खा.नारायण राणे यांना २७ हजारांचे मताधिक्य मिळालेले असल्याने आ.वैभव नाईक बॅक फुटवर आहेत. या मतदारसंघात महायुतीकडून माजी खासदार निलेश राणे निवडणूक लढवतील. गेली पाच वर्षे त्यांनी या मतदारसंघात दांडगा लोकसंपर्क राखला आहे. यामुळे निवडणूक आली म्हणून निलेश राणे मतदारांपर्यंत जात नाही आहेत. तर त्यांचा नेहमीच जनसंपर्क राहिला आहे. त्याचा चांगला परिणाम या निवडणुकीत दिसेल आणि फायदाही निलेश राणे यांना होऊ शकतो, असा राजकीय धुरिणांकडून व्यक्त करण्यात येत आहे, तर सिंधुदुर्गातील सावंतवाडी मतदारसंघात इच्छुकांची बाहुगर्दी आहे. या मतदारसंघात सावंतवाडीचे विद्यमान आमदार आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे महायुतीकडून पुन्हा निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपा कार्यकर्त्यांबरोबरच दीपक केसरकर यांनी स्वत:ची प्रचार यंत्रणा राबविली. जेणेकरून मतदारांशी लोकसभा निवडणूक निमित्ताने संपर्क साधता आला. यामुळे पुन्हा एकदा महायुतीकडून दीपक केसरकर निवडणूक रिंगणात दिसले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. माजी आमदार राजन तेली यांचा मागील निवडणुकीत ९ हजार मतांनी पराभव झालेला.

त्यामुळे राजन तेली या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. काहीही झालं तरीही सावंतवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवणारच असा मनोमन त्यांनी चंगच बांधला आहे. मागील पाच वर्षांत ते संपर्क ठेऊनही आहेत. माजी नगराध्यक्ष संजू परबही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास अधून-मधून इच्छुक असतात. त्यांचा मतदारसंघात संपर्क आहे. या मतदारसंघात आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे विशाल परब. सामाजिक उपक्रम राबवत या-ना त्या कारणाने विशाल परब चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीच्या अर्चना घारे-परब या सावंतवाडीच्या माहेरवाशिनी असल्याने गेल्या पाच वर्षांत त्या संपर्कात आणि चर्चेत राहिल्या आहेत. माजी खा. विनायक राऊतही निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. या मतदारसंघातून शिवसेनेचे सतीश सावंतही प्रयत्नशील आहेत. यामुळे या मतदारसंघातून प्रयत्नशील आहेत. महायुतीकडून कोण? आणि महाविकास आघाडीतर्फे कोणाला उमेदवारी मिळणार या प्रश्नाचे उत्तरही उमेदवारी जाहीर झाल्यावरच मिळेल.

रत्नागिरी जिल्ह्यातही रत्नागिरी मतदारसंघातून विद्यमान आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत महायुतीकडून निवडणूक रिंगणात असतील तर ठाकरे सेनेकडून उदय सामंत यांच्याविरोधात कोणाला उभं केलं जातंय हे पहाणे औत्सुक्याचे आहे. रत्नागिरी मतदारसंघात ठाकरे गटाचा उमेदवार कोण असावा हे देखील उदय सामंतच ठरवतील अशी चर्चा आहे. राजापूर मतदारसंघात शिवसेनेचे राजन साळवी यांनाच ठाकरे सेना उमेदवारी देणार की, काँग्रेसच्या मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या लाड यांना उमेदवारी देणार यामुळे या मतदारसंघात महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळेल हे निश्चित झालेले नाही. मात्र या मतदारसंघात भैया सामंत मतदारसंघात दौरे करताना दिसतात.

लांजा-राजापूर मतदारसंघात काँग्रेसचे स. मु. ठाकरे, अॅड. ल. र. हातणकर वगळता आजवर मतदारसंघाबाहेरील व्यक्तीलाच आमदार म्हणून निवडून देण्यास या मतदारसंघातील जनता फारच उत्सुक असते. चिपळूण मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादीचे शेखर निकम की, आणखी कोणाचा विचार होऊ शकतो. गुहागर मतदारसंघात महाविकास आघाडीचे आ. भास्कर जाधव की, त्यांचे पूत्र निवडणूक लढवणार हे लवकरच समजून येईल. तर या मतदारसंघाचे डॉ. विनय नातू यांनी प्रतिनिधित्व केलेले असल्याने पुन्हा एकदा डॉ. विनय नातू यांना नशीब आजमावण्याची संधी मिळू शकते. तर दापोली मतदारसंघात विद्यमान आमदार योगेश कदम विरोधात महाविकास आघाडीकडून कोणाला उभे केले जाणार हे पाहावं लागेल. एकूणच कोकणात महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागा वाटप आणि चर्चेत गुऱ्हाळ सुरू आहे. मात्र, कालची सर्वपित्री अमावस्या झाल्याने पितृपक्ष संपून नवरात्र प्रारंभ आजच्या घटस्थापना दिवसापासून महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -