पंतप्रधान मोदींनी साधला अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा
नवी दिल्ली : ‘मन की बात’ या कार्यक्रमात मी जवळपास ८०० स्वच्छता कार्यक्रमांचा उल्लेख केला. लोक स्वच्छता ठेवण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नांना पुढे आणत आहेत. मी बघतोय की, जे आज होत आहे, ते यापूर्वी का झाले नाही?, महात्मा गांधींनी तर हा रस्ता दाखवला होता. सुचवलेही होते. काही लोकांनी गांधीजींच्या नावाने फक्त मते घेतली, पण त्यांचा विचार विसरून गेले. ते लोकांनी अस्वच्छतेलाच आयुष्य मानले, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर निशाणा साधला.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. स्वच्छतेचा विचार महात्मा गांधींनी दिला होता, पण त्याचा काही लोकांना विसर पडला, असेही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी जयंतीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांसोबत स्वच्छता अभियानात सहभाग घेतला आणि साफसफाई केली.
स्वच्छता अभियानाला दहा वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित केले. मोदी म्हणाले की, स्वच्छता मोहिमेंतर्गत जे आपण आज करतोय, ते यापूर्वी का झाले नाही?, असा सवाल त्यांनी केला.
‘एक मोठा वर्ग होता, ज्याला घाण करणे त्याचा अधिकार वाटत होता. कोणी स्वच्छता करत असेल, तर त्यांना हिणवायचा आणि अंहकाराने जगायचे. जेव्हा मी स्वच्छता करायला लागलो, तेव्हा त्यांना वाटले की, मी जे करतोय तेही मोठे काम आहे. आता अनेक लोक माझ्यासोबत जोडले जात आहेत. स्वच्छ भारत अभियानामुळे मोठे मानसिक परिवर्तन झाले आहे आणि स्वच्छता करणाऱ्यांना आदर मिळत असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
करोडो भारतीयांकडून स्वच्छ भारत मिशन स्वीकार
गेल्या १० वर्षांत करोडो भारतीयांनी स्वच्छ भारत मिशन स्वीकारले आहे. भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, माजी राष्ट्रपती, माजी उपराष्ट्रपती यांनीही स्वच्छता सेवा केली आहे. १५ दिवसांच्या सेवा पंधरवाड्यात २८ कोटी लोकांनी सहभाग घेतला. आजपासून हजार वर्षांनंतरही जेव्हा २१व्या शतकातील भारताचा अभ्यास केला जाईल तेव्हा स्वच्छ भारत अभियानाची आठवण नक्कीच होईल. आज स्वच्छता अभियानाशी संबंधित १० हजार कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. अमृत मिशन अंतर्गत देशातील अनेक शहरांमध्ये पाणी आणि सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले जाणार आहेत. मग ते नमामि गंगेशी संबंधित काम असो किंवा कचऱ्यापासून बायोगॅस तयार करणारी वनस्पती असो, ते स्वच्छ भारत मिशनला नव्या उंचीवर नेतील. स्वच्छ भारत मिशन जितके यशस्वी होईल तितका आपला देश चमकेल, असा आशावाद पंतप्रधान मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
राजघाटावर महात्मा गांधींना पंतप्रधान मोदींकडून अभिवादन
आज देश राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५५ वी जयंती साजरी करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करत आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. ते म्हणाले की, सर्व देशवासियांच्या वतीने आम्ही आदरणीय बापूंना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो. सत्य, समरसता आणि समतेवर आधारित त्यांचे जीवन आणि आदर्श देशवासीयांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील.
मोदींनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनाही वाहिली श्रद्धांजली
पंतप्रधान मोदींनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनाही श्रद्धांजली वाहिली. त्यांनी पोस्टमध्ये लिहिले की, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. त्यांनी देशाचे सैनिक, शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपले जीवन समर्पित केले.