एन्काउंटर खरा की खोटा याविषयीचा अहवाल तीन महिन्यात करणार सादर
मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीला ३ महिन्यांत अहवाल सादर करावा लागणार आहे.
दरम्यान, लैंगिक छळाच्या गुन्ह्यातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी सीआयडीने चौकशी सुरू केली आहे. ठाण्याच्या मुंब्रा बायपासवर शाळकरी मुलींच्या लैंगिक छळप्रकरणी न्यायालयीन कोठडीतील आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी पोलिस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर ठाणे एसआयटीने चौकशी सुरू केली होती. विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टीका केल्यानंतर आणि चकमकीदरम्यान घडलेल्या घटनांच्या पोलिसांच्या माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला पोलीस चकमकीत ठार करण्याच्या घटनेचे ठाणे पोलिसांच्या निर्णयाचे समर्थन केल्यानंतर, महाराष्ट्र सरकारने नुकतेच या चकमकीच्या चौकशीसाठी न्यायालयीन आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती दिलीप भोसले असतील. ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश होते. न्यायमूर्ती भोसले हे मे २०२४ मध्ये घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेच्या चौकशीच्या समितीचेही नेतृत्व करत आहेत. हा एक सदस्यीय आयोग २३ सप्टेंबरची चकमक खरी होती की खोटी यासाठी याच्याशी संबंधीत प्रत्येकाचा तपास करणार आहे.