पुणे : पुणे-मुंबई दरम्यानचा रेल्वे प्रवास (Pune mumbai railway) जलद गतीने व्हावा यासाठी बोरघाटात दोन नव्या मार्गिका टाकण्यात येणार आहे. यासाठी कोकण रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर) काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी मार्गिकेचे आरेखन करण्यासाठी ‘लिडार सर्व्हे’ झाला. यात हेलिकॉप्टरवर कॅमेरा लावून सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. येत्या दोन महिन्यांत हा अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्यात येणार आहे.
बोरघाटात दोन नव्या मार्गिकेसाठी सात पर्याय सुचविण्यात आले आहेत. शिवाय त्याचा वेग ताशी १२० किलोमीटर इतका ठरविण्यात आला असून नव्या मार्गिकेमुळे घाटातील चढण कमी होणार आहे. मात्र यादरम्यान घाटातील अंतर वाढणार आहे. या प्रकल्पासाठी आठ हजार ते १८ हजार कोटींपर्यंतचा खर्च अपेक्षित आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव या प्रकल्पासाठी आग्रही असल्यामुळे रेल्वे बोर्डाला ‘डीपीआर’ सादर झाल्यावर त्यास मंजुरी मिळणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.