चंद्रपूर : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर झोन मधील पर्यटन १ जुलैपासून बंद झाले होते. आता पावसाळी सुट्टी संपली असून उद्यापासून ताडोबाचे सर्व दरवाजे उघडणार आहेत. आज प्रकल्पाला सुट्टी राहत असल्याने एक दिवस उशिरा प्रकल्प उघडणार आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे स्थान आहे. या व्याघ्र प्रकल्पाला येणाऱ्या व्याघ्रप्रेमींची संख्या मोठी आहे. पण जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवण्यात येतात. मातीचे रस्ते असल्याने पावसाळ्यात या संरक्षित जंगलांमध्ये भ्रमंती करणे कठीण असते. पण ताडोबात बहुतांश रस्ते चांगले असल्याने त्यामुळे सफारीला बहुदा फटका बसत नाही. पण राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता ताडोबाचा कोअर झोन पावसाळ्यात पूर्णपणे बंद ठेवण्यात येतो. त्यामुळे ताडोबाला पावसाळी सुट्टी मिळात असते. येथील बफर झोनचे पंधरा दरवाजे पाऊस, रस्ते स्थिती व उपलब्धता बघून हे पर्यटनासाठी कमी -अधिक प्रमाणात खुले ठेवण्यात येत होते. त्यामुळे बफर क्षेत्रात मान्सून पर्यटन सुरु होते. यंदा मान्सून पर्यटनाला संपूर्ण मोसमात बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला आहे.
दरम्यान, १ मार्च २०२४ ते ३० जून २०२४ या चार महिन्यांच्या कालावधीत सुमारे कोअर व बफर मिळून सुमारे ८५ हजारांहून जास्त पर्यटकांनी हजेरी लावली आहे. परिणामी व्याघ्र दर्शनासाठी प्रख्यात असणारा ताडोबा-अंधारी प्रकल्प हा व्याघ्र पर्यटनात राज्यात पुन्हा एकदा ताडोबा अव्वल ठरला होता. आता दिवाळीत पर्यटकांची धूम दिसणार असल्याचे संकेत आहेत.