Tuesday, April 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा बदलणार

महाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा बदलणार

केंद्रीय मंत्री अमित शहा यांचा दावा

राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येण्याचा ठाम विश्वास

मुंबई : मी सामान्य कार्यकर्त्यापासून भाजपाच्या अध्यक्षपदापर्यंत मजल मारली. त्यामुळे मला कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नेहमीच आनंद होतो. काही निवडणुका देशाच्या राजकारणाची दिशा ठरवतात. हे मी माझ्या अनुभवाने सांगत आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूकही तशीच आहे. या निवडणुकीमुळे देशाच्या राजकारणाची दिशा अन् दशा बदलेल. कारण, मागील ६० वर्षांत कोणत्याही राजकीय पक्षाला सलग ३ वेळा जिंकण्याची कामगिरी करता आली नाही. महाराष्ट्राची आगामी विधानसभा निवडणूक देशाची दिशा अन् दशा बदलणारी असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी येथे भाजपा पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केला.

अमित शहा मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून गत महिन्याभरातील त्यांचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा आहे. या दौऱ्यात ते मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी, मेळाव्याच्या सुरुवातीलाच त्यांनी कार्यकर्त्यांना भाषणाचा व्हिडिओ किंवा ऑडिओ रेकॉर्ड न करण्याचा सल्ला दिला. तसेच महाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा अन् दशा बदलणारी असल्याचाही दावा केला.

महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार

निवडणुकीच्या निमित्ताने मी देशभर फिरत आहे. सगळीकडे केवळ महाराष्ट्रात काय होणार? असा प्रश्न विचारतात, असे नमूद करत अमित शहा यांनी यावेळी कार्यकर्त्यांना उद्देशून महाराष्ट्रात काय होणार? असा प्रश्न केला. त्यावर कार्यकर्त्यांनी आपण जिंकणार असा पुकारा केला. तसेच महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार येणार असा विश्वासही व्यक्त केला.

भाजपाने आपला विचार केव्हाच सोडला नाही

अमित शहा पुढे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत आपल्या २ जागा निवडून आल्या असतानाही आपला एकही कार्यकर्ता पक्ष सोडून गेला नव्हता. हा आपल्या पक्षाचा इतिहास आहे. ८० च्या दशकातील सर्वच कार्यकर्त्यांना आपला पराभव होणार हे माहिती होते. पण त्यांची त्यांना कोणतीही तमा नव्हती. आपण राजकारणात पंतप्रधान किंवा इतर कोणत्याही पदासाठी नव्हे तर महान भारताच्या रचनेसाठी आलोत अशी त्यांची भावना होती. सरकार येते आणि जाते. आपले सरकार १० वर्षे चालले, पण आपण आपला विचार केव्हाच सोडला नाही.

राहुल गांधींवरही साधला निशाणा

अमित शहा यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधींवरही निशाणा साधला. अमित शहा म्हणाले की, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आतापर्यंत किती निवडणुका जिंकल्या? एखाद्या परीक्षेत ९० टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्याला ८५ टक्के गुण मिळाले, पण नेहमी २० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला ३० टक्के गुण मिळाले, तर तो विद्यार्थी गावभर मिठाई वाटतो. राहुल गांधी असा मूर्खपणा करत आहेत. विजयी होणाराच सरकार स्थापन करतो. त्यामुळे निराशेला गाडून कामाला लागा. महाराष्ट्रात भाजप महायुतीचे सरकार येईल असा मी शब्द देतो.

उद्धव ठाकरेंचा जनाधार संपला; त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचतात

आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत. ते जिंकण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वास ठेऊ नका, गाफील राहू नका. सरकारने केलेल्या कामांमुळे लोक आपल्यासोबत आहेत. मात्र अतिआत्मविश्वासामुळे आपली विकेट पडू देऊ नका. राज्यातील 3 कोटींपेक्षा जास्त जनता ही सरकारी योजनांचा लाभ घेत आहे. त्यांचे मते आपल्याला मिळाली तर राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा येईल. उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपला आहे. मराठी व हिंदू मते सोबत नसल्याने त्यांच्या रॅलीमध्ये हिरवे झेंडे नाचत असल्याची टीका भाजपा नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत. ते जिंकण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहेत. त्यामुळे अतिआत्मविश्वास ठेऊ नका, गाफील राहू नका. सरकारने केलेल्या कामांमुळे लोक आपल्यासोबत आहेत. मात्र अतिआत्मविश्वासामुळे आपली विकेट पडू देऊ नका, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -