मुंबई: कानपूर कसोटीत भारताच्या बांगलादेशवरील विजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल स्पर्धेचे समीकरण बदलत असल्याचे दिसत आहे. भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशला २-० असे हरवले. ३ दिवस पावसाने गोंधळ घातल्यानंतर भारताने आक्रमक खेळ करताना दुसरा कसोटी सामना ७ विकेटनी जिंकला. टीम इंडियासाठी ही चांगली बाब म्हणजे टेलमध्ये त्यांनी दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली आघाडी मिळवली आहे.
WTC पॉइंट्स टेबल
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टेबल पॉईंट्सच्या टक्केवारीवर आधारित बनवली जाते. भारत सध्या ७४.२४ टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहे. बांगलादेशला क्लीन स्वीप दिल्यानंतर सलग तिसऱ्या फायनल खेळण्याच्या भारताच्या आशा वाढल्या आहेत. दुसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलिया आहे. त्यांचे पॉईंट्स ६२.५० आहेत तर तिसऱ्या स्थानावर श्रीलंका आहे. त्यांनी नुकतेच न्यूझीलंडला कसोटी मालिकेत २-० असे हरवले.
३ संघांमध्ये फायनलला टक्कर
भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात फायनलची टक्कर आहे. या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचाही समावेश होऊ शकतो. ते पुढीलम हिन्यांमध्ये बांग्लादेश, श्रीलंका आणि पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहेत. जर द. आफ्रिकेने या सर्व मालिका जिंकल्या तर त्यांची टक्केवारी ७०पेक्षा अधिक होईल.