मंदिरामध्ये मृत माणसाची मूर्ती स्थापन करून पूजा करणे वर्ज्य
वाराणसी : उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे सनातन रक्षक दल संघटनेने तब्बल १० मंदिरांमधून साईबाबांच्या (Sai Baba) मूर्ती हटवल्या आहेत. या मूर्ती सन्मानपूर्वक हटवल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
यासंदर्भातील माहितीनुसार, काशीच्या बडा गणेश मंदिर, पुरुषोत्तम मंदिर इत्यादी १० प्रमुख मंदिरामधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात आल्या आहेत.
सनातन रक्षक दलाने याबाबत सांगितले की, आतापर्यंत आम्ही अज्ञानामधून साईबाबांची पूजा करत होतो. आता आम्ही मूर्ती हटवत आहोत. पूर्ण सन्मानासह मंदिर व्यवस्थापनाच्या मान्यतेनंतर साईबाबांच्या मूर्ती हटवण्यात येत आहेत. वाराणसीमध्ये मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवण्याची सुरुवात बडा गणेश मंदिर येथून करण्यात आली. सनातन रक्षक दलाच्या सदस्यांनी या मंदिरातील साईबाबांची मूर्ती कापडामध्ये गुंडाळून तिथून बाजूला केली. त्यानंतर इतर मंदिरातील मूर्ती हटवण्याची तयारी सुरू झाली.
साईबाबांच्या मूर्ती हटवण्यामागचे कारण सांगताना सनातन रक्षक दलाने सांगितले की, आम्ही साई बाबांचे विरोधक नाही आहोत. मात्र शास्त्रानुसार कुठल्याही मंदिरामध्ये मृत माणसाची मूर्ती स्थापन करून तिची पूजा करणे वर्ज्य आहे.
हिंदू धर्मानुसार मंदिरांमध्ये केवळ सूर्य, विष्णू, शिव, शक्ती आणि गणपती यांच्या स्वरूपात मूर्ती स्थापन केल्या जाऊ शकतात. यापूर्वी देखील शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी साई पूजेला विरोध केला होता. तर बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्त्री यांनीही साई बाबांच्या पूजेला विरोध केला होता. ते म्हणाले होते की, मी साईबाबांचा विरोधक नाही. साईबाबांची महात्मा म्हणून पूजा होऊ शकते. मात्र परमात्मा म्हणून त्यांची पूजा होऊ शकत नाही.