पुणे : परतीच्या प्रवासावर निघालेला मान्सून (monsoon) काही अडथळ्यांमुळे धीम्या गतीने पुढे सरकत आहे. मात्र, सोमवारपासून या प्रवासाला गती मिळत असून, आणखी वेगाने मान्सून परतण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. मात्र मान्सून परतीच्या मार्गावर असताना, तापमानात वाढ होत आहे. मात्र यंदा पावसाने समाधानकारक कामगिरी केली आहे.
महाराष्ट्रातील दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे यलो अलर्ट जारी केला गेला आहे. मात्र, कोकण वगळता राज्याच्या उर्वरित भागांमध्ये पाऊस उघडीप देणार असून, काही ठिकाणी हलकी रिमझिम होण्याची शक्यता आहे.
‘ऑक्टोबर हिट’चे संकेत
पावसाने विश्रांती घेतल्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान वाढत आहे. त्यामुळे ‘ऑक्टोबर हिट’च्या सुरुवातीचे संकेत मिळत आहेत. सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि बीड या भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी पडतील, पण त्यातून कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या वर्षी भारतात एकूण ९३४.८ मिमी पावसाची नोंद झाली आहे, जे सरासरीच्या १०८ टक्के आहे. विशेषत: मध्य भारतात १९ टक्के आणि पूर्व-पूर्वोत्तर भागात १४ टक्के अधिक पाऊस झाला आहे. जूनमध्ये ११ टक्के कमी पाऊस झाला असला तरी जुलैमध्ये पावसाचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे.