मुंबई : येत्या ८ ते १० दिवसांत विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता असून, राज्यात भाजपाने आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. या अनुषंगाने महिन्याभरात राज्यात दोन दौरे करणारे भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) १ ऑक्टोबरला पुन्हा मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मुंबई आणि नवी मुंबईत सभा घेणार असून, मुंबई तसेच कोकणातील विधानसभा जागांचा आढावा घेणार आहेत.
मागील काही दिवसांत विदर्भ, मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता १ ऑक्टोबरला दादर येथील योगी सभागृहात दुपारी १ वाजता मुंबईतील सर्व ३६ विधानसभा मतदारसंघांतील प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. विधानसभा निवडणुकीपाठोपाठ महानगरपालिकेच्या निवडणुकाही होऊ घातलेल्या आहेत. अशा परिस्थितीत मुंबईमध्ये विधानसभेबरोबरच महापालिकेची मोहीम फत्ते करण्यासाठी मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या नेतृत्वात आराखडा तयार केला गेला असून, याबाबत सविस्तर माहिती अमित शहा यांना देण्यात येणार आहे.
यासोबतच ठाणे आणि कोकणात भाजपाची काय परिस्थिती आहे? याचाही आढावा घेतला जाणार आहे. यानंतर सायंकाळी ४ वाजता अमित शहा हे सिडको कन्व्हेक्शन सेंटर, नवी मुंबई येथे कार्यकर्ते आणि नेते यांच्याशी संवाद साधणार आहेत.