इमारतीत वर्दळ असूनही मदतीला कोणीच धावून आले नाही
बारामती : पुणे जिल्ह्यात कोयता गँगने गेल्या काही महिन्यांपासून दहशत माजवली. हे हिंसाचाराचे लोण आता बारामतीसारख्या शहरापर्यत पोहोचले आहे. बारामती शहरात, तुळजाराम चतुचंद महाविद्यालयाच्या परिसरात एका बारावीच्या विद्यार्थ्याची दिवसाढवळ्या कोयत्याने हत्या झाल्याने शहर हादरून गेले आहे. हा हल्ला महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीजवळ झाला. धक्कादायक बाब म्हणजे, इमारतीत वर्दळ असूनही मदतीला कोणीच धावून आले नाही. त्यामुळे समाजात माणुसकीच हरवली का? असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हत्येचा आरोपी आणि मृतक दोघेही एकाच वर्गात शिकत होते. दोघांमध्ये काही दिवसांपासून कडाक्याचे भांडण सुरू होते. त्याचे पर्यवसान या दुर्दैवी घटनेत झाले. हल्ला करताच आरोपीपैकी एक पळून गेला, तर दुसरा पोलिसांना सापडला आहे.
घटना घडली तेव्हा इमारतीत विद्यार्थी, शिक्षक, तसेच सुरक्षारक्षकांची ये-जा सुरू होती. मात्र, कोणीही हल्ला थांबवण्याचा किंवा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला नाही. समाजातील अशा घटनांवर लोकांच्या असंवेदनशीलतेचा सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे शहरातही याआधी अशा हल्ल्यांच्या घटनांनी चिंता वाढवली आहे. पोलिसांनी या टोळीवर कारवाई केली असली, तरी हिंसाचाराचे लोण बारामतीसारख्या शहरापर्यंत पोहोचल्याने, पोलिसांचा धाक कमी होत चालला आहे का, असा प्रश्न समाजात उपस्थित होत आहे.
या घटनेने पुन्हा एकदा पुणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरातील कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर समाजाने जागृत होण्याची, तसेच पोलीस यंत्रणेने अधिक कठोर पावले उचलण्याची गरज आहे.