कानपूर: भारतीय संघ आणि बांग्लादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना २७ सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीनपार्क स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. सामन्याच्या सुरूवातीचे ३ दिवस इंद्रदेव चांगलेच बरसले. यामुळे खेळावर मोठा परिणाम झाला. पावसामुळे पहिल्या दिवशी केवळ ३५ षटकांचा खेळ झाला होता. यात बांगलादेशने ३ विकेट गमावताना १०७ धावा केल्या होत्या.
सामन्याच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ ओल्या मैदानामुळे होऊ शकला नव्हता. मात्र चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारतीय गोलंदाजांनी कहर केला. लंच ब्रेकनंतर बांगलादेशचा डाव २३३ धावांवर आटोपून लावला.
गोलंदाजांनंतर फलंदाजांचा कहर
या दरम्यान वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ३ विकेट मिळवल्या तर मोहम्मद सिराज, आकाशदीप आणि स्पिनर रवीचंद्रन अश्विनने प्रत्येकी २-२ विकेट मिळवल्या. एक विकेट रवींद्र जडेजाने मिळवला. यानंतर भारताच्या फलंदाजांनी बांगलादेशवर जोरदार प्रहार केला.
भारतीय संघाने बेजबॉल गेम खळताना ९ बाद २८५वर डाव घोषित केला. भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जायसवाल आणि रोहित शर्माने मैदानावर येताच बॅटिंग सुरू केली. जायसवाल आणि रोहितने मिळून ३ षटकांत ५१ धावा केल्या होत्या. रोहित शर्मा २३ धावा करून बाद झाला तर दुसरीकडे जायसवालने केवळ ३१ चेंडूत अर्धशतक ठोकले. त्याचा खेळ ७२ धावांवर समाप्त झाला. दरम्यान, सामन्याचा एकच दिवस शिल्लक होता त्यामुळे फलंदाज जोरदार फटकेबाजीच्या इराद्याने मैदानावर उतरले होते. विराट कोहलीने ४७ तर केएल राहुलने ६८ धावांची वेगवान खेळी करत भारताला २८५ धावांवर पोहोचवले.