कथा – रमेश तांबे
एक होती मुलगी. तिचे नाव लक्ष्मी. दहा-बारा वर्षांची एक चुणचुणीत मुलगी. रंगाने थोडीशी सावळी पण नाकी-डोळी नीटशी! चेहऱ्यावर आत्मविश्वासाचे तेज झळकायचे तिच्या. लक्ष्मी शाळेत जायची. शाळा सुटल्यावर आईला भाजी विकायला मदत करायची. लक्ष्मीची आई चौकात रस्त्याच्या कडेला दिवसभर बसायची. भाजी विकून चार पैसे कमावत होती. लक्ष्मीचे बाबा कधीच देवाघरी गेले होते. त्यामुळे तीन मुलांची जबाबदारी तिच्या आईनेच उचलली होती. तीन भावंडात लक्ष्मी सर्वात मोठी. लक्ष्मीच्या आईला शिक्षणाचे महत्त्व समजले होते. त्यामुळे तिने आपल्या तीनही मुलांना शाळेत घातले होते. पण शाळेचा खर्च भागवता भागवता लक्ष्मीच्या आईच्या नाकीनऊ येत असत.
ही ओढाताण लक्ष्मीला कळायची. पण लक्ष्मी होती अवघी बारा-तेरा वर्षांची. सातवी-आठवी शिकणारी. शाळा सोडून आपणही भाजी विकण्याचा धंदा करावा असे तिला वाटायचे. तिने कित्येक वेळा आईला म्हटलेसुद्धा. पण शाळा सोडण्याचा विचार आईला अजिबात पसंत नव्हता. रविवारी सकाळी १० वाजता लक्ष्मी स्वतःच भाजी घेऊन बसली होती. समोर भलामोठा रस्ता. फुटपाथवर लोकांची ये-जा सुरू होती. काही लोक लक्ष्मीकडून भाजी घ्यायचे. पण बराच वेळ गिऱ्हाईक आले नाही म्हणून लक्ष्मी बैचेन झाली होती. कारण ऊन वाढू लागल्यावर भाजी लवकर सुकून जाईल याची तिला भीती वाटत होती. इतक्यात एक लहान मूल आई-बाबांचा डोळा चुकवून रस्त्यावरून पलीकडे जाण्यासाठी धावू लागले. खरं तर गाड्या खूप वेगाने धावत होत्या. इतक्यात एक गाडी वेगाने आली. आता ते बाळ गाडीखाली येणार हे दिसताच, क्षणाचाही विचार न करता लक्ष्मी धावली आणि त्या मुलाला एका झटक्यात तिने बाजूला केले.
या धावपळीत लक्ष्मी थोडी धडपडली. पण तिने मुलाला वाचवलेच! गाडीच्या ब्रेकचा कर्णकर्कश आवाज झाला. पण ड्रायव्हरचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी रस्त्याच्या मधल्या खांंबाला धडकली. दहा-बारा माणसे धावली. त्यांनी त्या मुलाला आणि लक्ष्मीला सावरले अन् फुटपाथवर त्या दोघांना आणून बसवले. प्रत्येकजण लक्ष्मीचे कौतुक करू लागला. मोठे प्रसंगावधान दाखवत लक्ष्मीने त्या मुलाचे प्राण वाचवले होते. मुलाचे आई-बाबाही लक्ष्मीजवळ आले. त्यांनी घडला प्रसंग स्वतःच्या डोळ्यांनी बघितला होता. पण त्यावेळी जागेवर उभे राहून ओरडण्या रडण्यापलीकडे त्यांना काही करता आले नव्हते. पण क्षणार्धात निर्णय घेऊन मोठे प्रसंगावधान दाखवत लक्ष्मीने त्या मुलाचे प्राण वाचवले होते. त्यांनी लक्ष्मीचे खूप आभार मानले आणि तिला १० हजार रुपये देऊ केले.
पण लक्ष्मी म्हणाली, “काका मला पैसे नकोत. मी माझे कर्तव्यच केले. त्याच्याएवढाच मला छोटा भाऊदेखील आहे. भावासाठीच मी माझे प्राण धोक्यात घातले.” हे ऐकून त्या मुलाच्या आई-बाबांच्या डोळ्यांत पाणी आले. ते म्हणाले, तू एवढा मोठा पराक्रम केलास, तुला बक्षीस घ्यावेच लागेल. आता मात्र नाईलाजाने लक्ष्मी म्हणाली, “काका माझ्या शाळेचा खर्च कराल.” लक्ष्मीचे उत्तर ऐकून मुलाचे आई-बाबा अवाक् झाले. लक्ष्मीची शिकण्याची आवड बघून एका क्षणात त्यांनी
“हो” म्हटले.
‘‘लक्ष्मी तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आजपासून आम्ही घेत आहोत,” असे त्या मुलाच्या बाबांनी म्हणताच लक्ष्मीचे डोळे भरून आले. मोठ्या कृतज्ञतेने त्यांंच्याकडे बघत लक्ष्मी आपले पाण्याने भरलेले डोळे पुसू लागली. तोच त्या लहान मुलाने लक्ष्मीला ताई ताई म्हणत गच्च मिठी मारली. मग ते दृश्य पाहून साऱ्यांच्याच डोळ्यांत पाणी तराळले.