विशेष – भालचंद्र ठोंबरे
भारतीय वेदपुराणात अनेक प्रकारच्या देव-देवतांचे उल्लेख असून प्रत्येक देवतेकडे एका विशिष्ट बाबींच्या पालकत्वाची जबाबदारी असते. पुराणानुसार ब्रह्मा, विष्णू व महेश या प्रमुख देवता आहेत. त्याचप्रमाणे ब्रह्मा सृष्टीचे रचेता, विष्णू पालनकर्ता, तर महादेवाकडे वाईटाच्या विनाशाची जबाबदारी आहे. या तीनही देवता आपापले कार्य सक्षमपणे पार पाडत असल्यामुळे सृष्टीचा कारभार सुरळीतपणे चालू असतो.
सृष्टीचे निर्माता ब्रह्मदेवाला पाच शीर असल्याचा उल्लेख शिवपुराण व वामनपुराणात आहे. नंतर मात्र ब्रह्मदेवाला चारच शीर असल्याचे दर्शविले जाते. या पाचव्या शिराचे पुढे काय झाले याबद्दलची आख्यायिका शिवपुराण आणि वामनपुराण व पद्मपुराणात सांगितली आहे.
शिवपुराणानुसार भगवान विष्णूंच्या नाभीतून निघालेल्या कमळातून ब्रह्मदेव उत्पन्न झाले. त्यांनी खाली येऊन विष्णूला मी आल्यावरही आपण का उठला नाहीत, असे विचारले. त्यावर विष्णू म्हणाले सर्वसृष्टी माझ्यात आहे आपण माझ्या नाभीतूनच उत्पन्न झाल्याने माझे पूत्र आहात, त्यामुळे माझ्या उठण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यावरून या दोघांचा वाद होऊन वाद विकोपाला गेला व दोघात घनघोर युद्ध सुरू झाले. अखेर महादेव एका तेजाचे रूपात दोघांमध्ये आले व एका मोठ्या लिंगाचे रूपात बदलले व दोघांनाही लिंगाचा अंत शोधण्यास सांगितले. तेव्हा विष्णू व ब्रह्मदेव आपापल्या वाहनावर बसून विष्णू पातळाकडे तर ब्रह्मदेव वरच्या दिशेने शोधासाठी निघाले; परंतु लिंगाच्या अंताचा शोध लागला नाही. विष्णुनी परत येऊन आपल्याला शोध लागला नाही हे मान्य केले. मात्र वरच्या बाजूला गेलेल्या ब्रह्मदेवाला वर केतकीचे झाड दिसले. त्यांनी तेथूनच परत येऊन मला टोक दिसले, वाटल्यास केतकीच्या झाडाला विचारा असे म्हणाले. तेव्हा महादेवाला ह्याचा राग आला. त्यांनी तिसऱ्या नेत्रातून भैरवाला उत्पन्न केले व भैरवाने ब्रह्मदेवाचे पाचवे शीर कापून टाकले. केतकीच्या खोटेपणामुळे तिचा त्याग केला. तेव्हापासून पांढरे असूनही शंकराला केतकीचे फूल वाहत नाही. चुकूनही कोणी वाहल्यास त्याला अडचणीचा सामना करावा लागतो.
वामन पुराणानुसार महादेव आणि ब्रह्मदेवाचा एकदा श्रेष्ठत्वासाठी वाद झाला, वादाचे रूपांतर लढाईत झाले. या लढाईत शिवाचा पराभव झाला. त्यामुळे ब्रह्माच पाचवे मस्तक हसले व त्याने शिवाची टिंगल केली. याचा राग येऊन महादेवाने ब्रह्मदेवाचे हे पाचवे मस्तक कापले. तेव्हा ब्रह्मदेवाने एक शक्तिमान असुर निर्माण करून शिवाला मारण्यासाठी पाठविला. शिवाने विष्णूच्या मदतीने एक योद्धा निर्माण केला. दोघांचेही घनघोर युद्ध झाले. युग संपूनही युद्धाचा शेवट झाला नाही. तेव्हा विष्णूने ब्रह्मा व शिवाला थांबवून आता पुढील युगात पुन्हा लढा म्हणून सांगितले. पुढे ब्रह्माने निर्माण केलेला असूर कर्ण म्हणून व शिव आणी विष्णूचा योद्धा अर्जुन म्हणून जन्माला आले.