Sunday, March 23, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलठसका कसा लागतो?

ठसका कसा लागतो?

कथा – प्रा. देवबा पाटील

त्या दिवशी घराजवळच्या पटांगणावर खेळ खेळताना जयश्रीची एक मैत्रीण पडली व तिच्या डोक्याला टेंगूळ आले. घरी आल्यावर जयश्रीने आईला विचारणे सुरू केले.

“आई आपणास काही लागले असता तेथे टेंगूळ कसे काय येते?” ‘‘जयश्रीने घरी गेल्यावर आईला विचारले.’’
आईने तिला आधी थोडा आराम घेऊ दिला. मग एक लाडू खायला दिला व सांगू लागली.

“शरीराच्या कोणत्याही भागाला मार लागला म्हणजे तो भाग दुखावतो व तेथे रक्त साचून सूज येते. त्यालाच टेंगूळ म्हणतात. शरीराच्या ज्या भागाला मार लागतो. तेथील पेशी मरतात किंवा दुखावल्या जाता. मेलेल्या पेशींच्या जागी नवीन पेशी तयार करण्याची प्रक्रिया शरीरात त्वरित सुरू होते. तयार होणा­ऱ्या पेशींना रक्त, अन्न व प्राणवायूचा जास्त पुरवठा करावा लागतो.

शरीराद्वारे ही गरज त्वरित पूर्ण केली जाते. लागलेल्या भागात जास्त प्रमाणात रक्त आल्यामुळे ते रक्त सामावून घेण्यासाठी तो भाग थोडासा ताणला जातो आणि फुगतो. त्यालाच सूज आली किंवा टेंगूळ आले असे म्हणतात. तेथे रक्त जास्त आल्याने तो भाग लालसर होतो.” ‘‘आईने स्पष्टीकरण दिले.’’

“मग ती सूज कशी काय कमी होते गं आई?” ‘‘जयश्रीने पुन्हा प्रश्न टाकला.’’
“आई म्हणाली, जुन्या पेशींच्या जागी नवीन पेशी तयार झाल्या म्हणजे तेथील रक्तप्रवाह हळूहळू कमी होऊन पूर्ववत होतो व ती सूज आपोआप उतरते.”

एवढ्यात लाडू खाता खाता जयश्रीला ठसका लागला. “आई, आता बाबा शेतातून घरी यायला निघाले गं. त्यांनी शेतातून निघता निघता माझी आठवण केली म्हणून मला ठसका लागला.” ‘‘जयश्री म्हणाली.’’

“तसे नाही गं ताई, असे कुणी आठवण केल्याने कुणाला ठसका लागत नसतो. ती एक प्रतिक्षिप्त क्रिया असते. आता तू सांग बरं मला, आपण श्वासोच्छ्वास करतो म्हणजे काय करतो?” आईने विचारले.
“श्वास म्हणजे नाकावाटे बाहेरील हवा आत घेणे व उच्छ्वास म्हणजे शरीरातील हवा नाकाद्वारे बाहेर सोडणे. श्वासोच्छ्वास म्हणजे नाकाद्वारे बाहेरची हवा आत घेणे व आतील हवा बाहेर सोडणे असे मागे एकदा तूच तर मला सांगितले आहे ना आई?” ‘‘जयश्री प्रश्नार्थक नजरेने आईकडे बघत बोलली.’’

“बरोबर बेटा.” आईने पुन्हा बोलण्यास आरंभ केला, “आपल्या घशात एकमेकांना जोडलेल्या अन्न नलिका व श्वासनलिका अशा दोन नळ्या असतात. यातील श्वास नलिकेवर एक पातळ पडद्याचे झाकण असते. त्याला श्वासपटल असेही म्हणतात. ज्यावेळी आपण श्वासोच्छ्वास करतो त्यावेळी श्वासनलिकेचे मुख नेहमी उघडे असते. श्वासावाटे आत घेतलेली हवा श्वासनलिकेद्वारा फुप्फुसात जाते. ज्यावेळी आपण अन्न खातो किंवा पाणी पितो त्यावेळी मात्र श्वासनलिकेवर हे झाकण आडवे पडून तिचे मुख बंद होत असते. त्यामुळे आपला अन्नाचा घास किंवा पाण्याचा घोट हा अन्न नलिकेतच जातो; परंतु एखादेवेळी आपण भराभर जेवण करतो किंवा घाईघाईने पाणी पितो तेव्हा गडबडीत श्वासनलिकेवरील ही झडप श्वासनलिकेवर नीट पडत नाही. त्यामुळे श्वासनलिका बंद न होता तिचे तोंड किंचितसे उघडे राहते. अशा वेळी चुकूनही अन्नाचा कण वा पाण्याचा बारीक थेंबही श्वासनलिकेत गेल्यास ते फुप्फुसाला घातक असते. त्यामुळे त्या अन्नकणाला किंवा जलबिंदूला श्वासनलिकेतून त्वरित बाहेर फेकण्यासाठी फुप्फुस ताबडतोब फुप्फुसातील हवा श्वासनलिकेतून जोराने बाहेर फेकते. या जोराच्या बाहेर फेकलेल्या हवेनेच तो कण नाकातून बाहेर पडतो, आपणास जोराचा ठसका लागतो.”

एव्हाना जयश्रीचा लाडू खावून संपला. तिने उठून माठातील पेलाभर पाणी घेतले, प्यायले व परत आईजवळ येऊन “आई आता मी अभ्यासाला जाते.” असे म्हणत आपल्या अभ्यासाला गेली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -