माथेरान : ई रिक्षा स्टँड हे रेल्वे स्टेशन पासून जवळपास दीडशे मीटर अंतरावर असल्याने खड्डेमय रस्त्यातून स्टँड पर्यंत जाताना खूपच त्रासदायक बनत असल्यामुळे हे ई रिक्षाचे स्टँड रेल्वे स्टेशन गेटच्या बाहेरील जागेत घ्यावे अशी मागणी पर्यटकांमधून केली जात आहे.
राज्यात कुठेही गेल्यास प्रवासी वाहनांचे स्टँड हे रेल्वे स्टेशनच्या बाहेर जवळच असतात त्यामुळे प्रवाशांना सहजपणे आपल्या सामानाची नेआण तसेच वयोवृद्ध व्यक्ती किंवा लहान लहान मुलांना प्रवास करण्यासाठी सोयीचे बनते. मागील वर्षांपासून माथेरान मध्ये पर्यटकांना स्वस्त दरात सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने ई रिक्षाची सेवा उपलब्ध झाली आहे. त्यामुळेच याठिकाणी पावसाळ्यात कधी नव्हे एवढी पर्यटकांची गर्दी पहावयास मिळत आहे. राज्यातील विविध भागातून पर्यटक इथे आवर्जून भेट देत आहेत यापूर्वी दस्तुरी पासून गावात येण्यासाठी वाहतुकीची खूपच खर्चिक बाब होती परंतु ई रिक्षा सुरू झाल्यामुळे अगदी कमी खर्चात माणसी ३५ रुपयांत अवघ्या पाच ते सहा मिनिटांत दस्तुरी पासून रेल्वे स्टेशन पर्यंतचे हे अडीच किलोमीटर अंतर पार केले जात आहे.
सध्याचे ई रिक्षा स्टँड हे मुख्य रस्त्यावरील अरुंद जागेत असून बाजूला वीज वितरण कंपनीचे बंद अवस्थेतील जुने धोकादायक लोखंडी पोल उभे आहेत ते वाऱ्याच्या वेगाने केव्हाही पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या बाहेरील बाजूस ऐसपैस जागा उपलब्ध असून त्याठिकाणी हे ई रिक्षा स्टँड असावे अशी मागणी पर्यटक त्याचप्रमाणे वयोवृद्ध स्थानिक लोक करीत आहेत.
रस्त्यातून चालणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखंच
खासकरून आम्ही मिनीट्रेनच्या सफरीचा आनंद घेण्यासाठी मुलांना घेऊन येतो परंतु ह्या गाडीच्या फेऱ्या आणि बोग्यांची संख्या खूपच कमी असल्याने तिकिटे उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे नव्याने स्वस्तात आणि सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या ई रिक्षा हा एक उत्तम पर्याय निर्माण झाला आहे ही आनंदाची बाब आहे परंतु ह्या रिक्षाचे स्टँड स्टेशन पासून साधारणपणे दोनशे मीटर अंतरावर आहे त्यामुळे सामान आणि मुलांना स्टँड पर्यंत नेताना इथल्या खड्ड्यासमान रस्त्यातून चालणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखंच आहे त्यासाठी रिक्षा स्टँड रेल्वे स्टेशन जवळ घेतल्यास सर्वाना सोयीचे होईल, असं पर्यटकांचं म्हणणं आहे.