क्राइम – अॅड. रिया करंजकर
लग्न होऊन गेलेल्या मुली आपल्या सासरी सुखीच असतील असे नाही. ज्या घरात मुलींचा जन्म होतो. लहानपणापासून त्याच घराची त्यांना सवय झालेली असते. तेथील रितीरिवाज, संस्कृती त्यांनी आत्मसात केलेली असते. आपल्या हक्काच्या घरात त्या न सांगता वावरू असतात. मुलींचे लग्न झाल्यावर आपल्या जन्माच्या घरापेक्षा एक वेगळं असणार घर, तिथल्या सर्वच गोष्टी वेगळ्या असतात. आपली रक्ताची माणसे तिथे नसतात. अशा घरामध्ये मुली जुळून घेताना फार वेळ लागतो. काही मुली आपल्या सर्व इच्छा बाजूला ठेवून आपल्या सासरच्या घराची जोड देतात तर काहींना ते जमत नाही. आपल्या माहेरी ही गोष्ट अशी होती, ही गोष्ट इथे अशी का हे समजण्यातच फार वेळ निघून गेलेला असतो. आणि सासरची माणसे या मुलीला काय येत नाही, या मुलीला काही संस्कार दिले नाही असे म्हणून त्या मुलीला आपल्या घरातील वातावरणाशी जुळवून घेण्याचे सोडून तिला टोमणे मात्र मारत असतात. त्याच गोष्टींचे नंतर भांडणात रूपांतर होते आणि घटस्फोटातपर्यंत ही गोष्ट जाऊन पोहोचते. सासरची मंडळी कधीच विचार करत नाही की, आपण लग्न करून आणलेली मुलगी वेगळ्या संस्कृतीत, वेगळ्या वातावरणात वाढलेली आहे. त्यांना लगेच आपल्या घराशी जोडून घेणारी अशी मुलगी हवी असते.
छाया गावाकडच्या वातावरणात वाढलेली निसर्गाच्या सानिध्यात राहिलेली मुलगी. गावच्या वातावरणात एकमेकांशी मिसळून वागलेली मुलगी होती. तीच लग्न होऊन ती मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात आली. गावचं वातावरण शहराचं वातावरण यात फारच तफावत होती. सासरचं घर चाळीत होतं. आजूबाजूला चिटकून असलेली घर. निसर्ग विधीसाठी सार्वजनिक ठिकाणी जाणं. या सर्व गोष्टी तिच्या कल्पनेच्या बाहेर होत्या. त्यात तिला जुळवून घेता येत नव्हतं. गावी बिनधास्तपणे वावरलेली छाया. इथे मात्र बुझल्यासारखी वावरत होती. आजूबाजूशी कोणाशी बोलायचं नाही असे सासू सासऱ्यांनी, नवऱ्याने अगोदर तिला सांगितले होते. छायाला झोपडीमध्ये राहणं जमत नाही हे सासूने अोळखलं होते. म्हणून याच गोष्टीचा फायदा उचलून ते तिला सांगू लागले की, जा तुझ्या बापाकडून चांगले पैसे आण. आम्ही हा रूम विकून मोठे घर घेऊ आणि तिथे आपण राहू. छायाला या गोष्टी पटत नव्हत्या कारण अगोदरच तिच्या वडिलांनी लग्नात भरपूर खर्चही केला होता. तसेच योग्य असा हुंडाही दिला होता. तरीही लोकं अजून घर घेण्यासाठी पैसे मागत होते.
छायाची नणंदही तिला त्रास देत होती. तिचे असे म्हणणे होते की, छायाच्या वडिलांनी पैसे दिले तर भाऊ मोठा रूम घेईल आणि तिकडे राहायला जाईल आणि मला ही खोली मिळेल. म्हणून सर्व मिळून तिला त्रास द्यायला लागले. एक दिवस असेच कड्याक्याचे भांडण झालं. छायाचा नवरा रमेशने जवळच असलेला लोखंडी पाईप घेऊन छायाच्या डोक्यावर मारला आणि त्यातच छाया जमिनीवर कोसळली. घरातील लोकांना वाटलं की चक्कर येऊन पडली असेल एवढा जोराचा फटका लागला नसेल पण तिला उठवता उठवता मात्र सर्वांना टेन्शन आलं. डॉक्टरांना बोलवणार तरी कसे, म्हणून तिच्यावर पाणी टाकून बघितले. एक दिवस तिला तसेच ठेवले पण त्यांची खात्री झाली की, छायाचा मृत्यू झाला आहे. आता करायचं तरी काय म्हणून छायाचे सासरे, नवरा, सासू, ननंद, नंदेचा नवराही कटकारस्थानात सामील झाला. शरीराचा थोडा वास येऊ लागला होता म्हणून त्यांनी तिचे तुकडे केले आणि एका पोत्यामध्ये भरून ठेवले. आता हे पोतं करायचं काय आजूबाजूला वास येईल म्हणून या सासरच्या मंडळींनी डोकं लावून ते पोतं संध्याकाळच्या वेळेला मार्केटमध्ये नेऊन ठेवलं. त्यावेळी मार्केट गजबजलेलं नसतं. ते पोतं तसंच राहील नंतर वेळ मिळेल तसं ते आपण हलवू असा विचार या सासरच्या लोकांनी केला.
खुल्या वातावरणात राहिल्याने वास येणार नाही असं त्यांना वाटलं. दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये गजबज सुरू झाली. पोतं होतं तिथेच होतं. त्या पोत्यातून दुर्गंधी येऊ लागली म्हणून मार्केटमध्ये चर्चा सुरू झाली की, वास कुठून येतो. कोणाचा माल कुजलाय का असं वाटू लागलं पण तसं काहीच नव्हतं. शेवटी एका माणसाचे त्या पोत्याकडे लक्ष गेलं. जवळ गेल्यावर जास्तच वास जाणवला म्हणून पोलिसांना प्राचारणा करण्यात आली. पोत खोलून बघितलं तर त्यात शरीराचे तुकडे होते. डोक्यावरून ती छाया असल्याचं तिथल्या परिचयातल्या लोकांना समजलं. त्यांनी लगेच पोलिसांना तिच्या घरचा पत्ता सांगितला. पोलीस त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्यावर पोलिसांना आपल्या दारात बघितल्यावर सगळ्यांची तारांबळ उडाली आणि हे मात्र चाणक्य पोलिसांनी हेरलं. छाया कुठे आहे असे विचारल्यावर कोणालाच काही उत्तर देता येईना. आणि हेच खरे गुन्हेगार आहेत असे पोलिसांच्या लक्षात आल्यावर पोलिसांनी सासू-सासरे, नवरा, नणंद,नंदेचा नवरा यांना अटक केली.
(सत्य घटनेवर आधारित)