Friday, June 20, 2025

काव्यरंग : आज चांदणे उन्हांत हसले

काव्यरंग : आज चांदणे उन्हांत हसले

आज चांदणे उन्हांत हसले तुझ्यामुळे
स्वप्नाहून जग सुंदर दिसले तुझ्यामुळे


भाव अंतरी उमलत होते
पर मनोगत मुकेच होते
शब्दांतून साकार जाहले, तुझ्यामुळे


परोपरीचे रंग जमविले
स्तब्धच होते तरी कुंचले
रंगातून त्या चित्र रंगले, तुझ्यामुळे


करांत माझ्या होती वीणा
आली नव्हती जाग सुरांना
तारांतून झंकार उमटले, तुझ्यामुळे


हृदयमंदिरी होती मूर्ती
तिमिरी परंतु होता भवती
आज मंदिरी दीप तेवले, तुझ्यामुळे



सख्या रे, घायाळ मी हरिणी


हा महाल कसला? रानझाडी ही दाट
अंधार रातीचा, कुठं दिसना वाट
कुण्या द्वाडानं घातला घाव, केली कशी करणी?
सख्या रे, घायाळ मी हरिणी !


काजळकाळी गर्द रात अन् कंपकंप अंगात
सळसळणाऱ्या पानांना ही रातकिड्यांची साथ
कुठं लपू मी? कशी लपू मी? गेले भांबावुनी !


गुपीत उमटले चेहऱ्यावरती, भाव आगळे डोळ्यांत
पाश गुंतले नियतीचे रे तुझ्या नि माझ्या भेटीत
कुठं पळू मी? कुठं लपू मी? गेले मी हरवुनी !


गीत- जगदीश खेबूडकर
स्वर - लता मंगेशकर

Comments
Add Comment