पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
छत्रपती संभाजीनगर : ऑरीक-बिडकीन औद्योगिक प्रकल्पातील औद्योगिक गुंतवणूकीच्या माध्यमातुन मराठवाड्यातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यात केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिडकीन औद्योगिक क्षेत्राचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.
दूरदृश्यप्रणालीद्वारे बिडकीन औद्योगिक प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, पुणे येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, लोकसभेचे खासदार मुरलीधर मोहोळ, छत्रपती संभाजीनगर येथील ऑरिक हॉल, डीएमआयसी प्रकल्प, शेंद्रा येथून गृहनिर्माण मंत्री अतुल सावे. राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत कराड, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे ,डीएमआयसीचे सह व्यवस्थापकीय संचालक दत्ता भडकवाड, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे महाराष्ट्र औद्योगिक विकास एमआयडीसीचे प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे ,महेश पाटील यांच्यासह विविध उद्योग समूहाचे प्रतिनिधी, उद्योजक उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, शासनाने ऑरिक सिटीच्या उद्घाटनापासून ते प्रकल्पपूर्ती करण्याचे काम केले आहे. ८ हजार एकरवर या औद्योगिक वसाहतीचा विस्तार असून यामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक विविध उद्योगाच्या मार्फत करण्यात आली आहे. बिडकीन प्रकल्पाच्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्धतेबरोबरच पायाभूत सुविधांचाही विकास होत आहे.