Sunday, October 6, 2024
Homeसाप्ताहिककोलाजलता मंगेशकर...

लता मंगेशकर…

आपल्या अनेक भावभावना असलेल्या गाण्यांतून भारतरत्न लता मंगेशकर हे नाव आणि त्यांचे अष्टपैलू कर्तृत्व, श्रवणीय गाणी, त्या गाण्यांच्या आठवणी, गोष्टी, किस्से, कथा तसेच त्यांच्या आवडी-निवडी यातून त्या कायमच आपल्यासोबत असतील. लता मंगेशकर म्हणजे फक्त सात शब्द, सात सूर, सप्तरंगी वाटचाल इतकेच नव्हे तर बरेच काही आहे. अथवा होते. भारतीय चित्रपट, त्याचे संगीत आणि सर्व प्रकारचे संगीत यांची भारतीय संगीताची जगभरातील ओळख म्हणजे लता मंगेशकर ! लताजींच्या गायनाने तब्बल सात दशके अनेकांचे आयुष्य समृद्ध केले आहे. लता मंगेशकर हा कदापिही न संपणारा असाच एक महत्त्वाचा आणि सखोल विषय आहे.

विशेष – दिलीप ठाकूर

काही दिवस अजिबात उजडू नयेत अथवा असू नयेत असे मनोमन वाटते. पण अखेर तो दिवस येतोच आणि दुर्दैवाने वस्तुस्थिती स्वीकारावी लागते.

६ फेब्रुवारी २०२२ हा दिवस असाच एक वाईट बातमी घेऊन आला. श्रीमती लता मंगेशकर यांचे निधन. भारतरत्न लता मंगेशकर कालवश. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल मीडियात काही मिनिटांत बातमी जगभर पोहोचली आणि एका महान पर्वाची फक्त आणि फक्त देहरूपी सांगता झाली. आपल्या अनेक भावभावना असलेल्या गाण्यांतून लता मंगेशकर हे नाव आणि त्यांचे अष्टपैलू कर्तृत्व, श्रवणीय गाणी, त्या गाण्यांच्या आठवणी, गोष्टी, किस्से, कथा तसेच त्यांच्या आवडी-निवडी यातून त्या कायमच आपल्यासोबत असतील हे पुन्हा वेगळे सांगायला नकोच. जगभरातील अनेकांची हीच भावना आहे.

लताजींना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यातील काही विशेष उल्लेखनीय म्हणजे, पद्मभूषण (१९६९) आणि दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९).

लताजींबाबत माझी एक वेगळी आणि विशेष आठवण सांगतो, मुंबईतील अंधेरीतील भव्य क्रीडा संकुलात राज ठाकरे यांनी १९९६ साली ‘लता मंगेशकर संगीत रजनी’चे आयोजन केले असतानाची आठवण. मला श्रीकांतजी ठाकरे यांनी ‘विशेष निमंत्रित’ अशी या संगीतमय सोहळ्याची आमंत्रण पत्रिका दिल्याने मी स्टेजपासून अवघ्या चौथ्या रांगेतच असल्याने लतादीदी यांच्या गायनाचा आनंद तर झालाच पण अगदी त्या स्टेजवरील वादकांना एखादी छोटी सूचना त्या करत, अनेक गाण्यांतील संगीताची छोटी छोटी वाद्यरचना त्यांच्या लक्षात आहे याचेही दर्शन घडले. माझ्यासाठी हा सुखद आणि वेगळा अनुभव होता. आपणच यापूर्वी गायलेल्या अनेक गाण्यांतील बारकावे आजही त्यांच्या लक्षात आहेत हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखीन एक पैलू माझ्या लक्षात येत होता. तात्पर्य, त्यांनी चित्रपटासाठी पार्श्वगायन करताना ‘आजचे रेकाॅर्डिंग झाले’ अशा भावनेने (अथवा व्यावसायिक वृत्तीने. मनोरंजन क्षेत्रात व्यावसायिकता हा प्रचंड प्रचलित शब्द आहे) त्या बाहेर पडल्या नाहीत, तर त्यांनी त्यावेळच्या गाण्याचा अनुभव, आठवणी अगदी वाद्य संच आपल्यासोबत ठेवला. (फार पूर्वी पहिले गाणे आणि मग संगीत अशा पद्धतीने गाणी जन्माला येत. एकेका गाण्यावर चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, काही वादक यात तासनतास चर्चा होई, वाद होत आणि प्रत्यक्ष गाणे रेकाॅर्डिंगच्या वेळी पूर्ण वाद्य संच असे) आपल्या कामातील भावनिक गुंतवणूक आणि बांधिलकी म्हणतात ती हीच. लता मंगेशकर यांची जडणघडण अशा अनेक गोष्टींतून झाली असेही म्हटले जाते.

लता मंगेशकर म्हणजे फक्त सात शब्द, सात सूर, सप्तरंगी वाटचाल इतकेच नव्हे तर बरेच काही आहे. अथवा होते. भारतीय चित्रपट, त्याचे संगीत आणि सर्व प्रकारचे संगीत यांची भारतीय संगीताची जगभरातील ओळख म्हणजे लता मंगेशकर! जगात जेथे जेथे भारतीय माणूस आहे तेथे तेथे अनेक प्रकारच्या गाण्यांतून लता मंगेशकर यांचा आवाज कायम राहिला. इतकेच नव्हे तर त्यांनी अनेक देशांत संगीत रजनीचे कार्यक्रम केले. तेव्हा तेथील स्थानिक विदेशी नागरिकांनीही लतादीदींच्या सखोल गायनाला दाद दिली आणि तेही त्यांचे चाहते झाले. लता मंगेशकर म्हणजे एक प्रकारचे विद्यापीठ. ज्यात एकीकडे संगीत कला, गायन आणि पार्श्वगायन कौशल्य आहे. गायन म्हणजे गैरफिल्मी गाणी. भावगीते, भक्तिगीते, भजन, कोळीगीत वगैरे तर पार्श्वगायन म्हणजे त्या त्या चित्रपटाच्या नायिकेसाठी गाणे.

तेव्हा तो आवाज त्या अभिनेत्रीचाही वाटायला हवा, त्या अभिनेत्रीने चित्रपटात साकारलेली व्यक्तिरेखा विचारात घ्यायला हवी आणि हे प्रसंगानुरूप गाणे हवे. लताजींच्या गायनातील कमालीची विविधता यात दिसतेय. उठाये जा उनके सितम और जिए जा (अंदाज, सन १९४९) ऐकताना डोळ्यांसमोर नर्गिस येते. आजा रे परदेसी मै तो कब से खडी इस पार (मधुमती १९५८) ऐकताना वैजयंतीमाला आठवते. तेरा जाना दिल के अरमानो का लूट जाना (अनाडी, १९५९) आठवलं तरी नूतन आठवतेच. मोहे पनघट पे नन्दलाल छेड गयो रे (मुगल-ए-आझम, १९६०) ऐकताना डोळ्यांसमोर मधुबाला येणारच. आप की नजरो ने समजा प्यार के काबिल मुझे (अनपढ १९६२) हे माला सिन्हा गातेय असे वाटते. काटो से खिच के ये आंचल (गाईड, १९६५) हा वहिदा रहेमानचा आवाज वाटतो. नैनो में बदरा छाए बिजली सी चमके हाए (मेरा साया, १९६६) हे साधनासह आठवते.

आप मुझे अच्छे लगने लगे (जीने की राह, १९६९) तनुजाच्या खट्याळ आणि बोलक्या भावमुद्रेसह आठवते. सुनरी पवन, पवन पुरवया मैं हू अकेली (अनुराग, १९७२) मौशमी चटर्जीसह डोळ्यांसमोर येते. बेताब दिल की तमन्ना यही है (हॅसते जख्म, १९७३) गुणगुणताना प्रिया राजवंश आठवणारच. नैना मेरे रंग भरे सपने तो सजाने लगे (ब्लॅक मेल, १९७३) हे जणू राखीच गातेय असे वाटते. जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग (दाग, १९७३) हे डोळ्यांसमोर शर्मिला टागोरलाच आणते. यह कैसा सूरमंदिर है जिसमे संगीत नहीं (प्रेम नगर, १९७४) हे हेमा मालिनीच याची खात्री असते. मेरा पढने मे नहीं लागे दिल क्यू (कोरा कागज, १९७४) हे जया भादुरीच्या सर्व अदाकारीसह आठवते. रजनीगंधा फूल तुम्हारे महके यू ही जीवन मे (रजनीगंधा, १९७४) ऐकताना विद्या सिन्हाच हे घट्ट समीकरण असते. हमे और जीने की चाहत न होती (अगर तुम न होते, १९८४) हे रेखाच गातेय असे वाटते. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. लताजी त्या अभिनेत्रींच्या आवाजात गायल्या असा फिल येतो हे त्यांच्या पार्श्वनातील खूपच मोठे वैशिष्ट्य आहे आणि यशही आहे.

गैरफिल्मी गाणी आणि अशी चित्रपट गीते यात हाच मोठा फरक आहे आणि त्या दोन्हींत लता मंगेशकर यांच्या अष्टपैलू, बहुरंगी गुणवत्तेचा प्रत्यय येतो, तर दुसरीकडे छोट्या-छोट्या गोष्टीतील आनंद/आस्वाद घेण्याचा स्वभाव आहे. एकीकडे भारतातील संगीत वाटचालीतील त्या दीर्घकालीन सहभागी/साक्षीदार आहोत, तर दुसरीकडे त्यांचेे भावगीते असोत अथवा चित्रपटातील विविध मूडची गाणी असोत त्या सगळ्यांना न्याय देताना स्वतः आनंद घेत तोच आनंद इतरांनाही दिला आहे. त्यांच्या सहवासात आलेले अनेक जण तशा आठवणी सांगतील.

लता मंगेशकर यांनी एकूणच किती गाणी गायली, किती प्रकारची गाणी गायली, किती भाषांतील गाणी गायली या सगळ्याच्या पलीकडे जाऊन त्यांची ‘संगीत क्षेत्रातील यशस्वी आणि चौफेर वाटचाल सुरू आहे. तरी उपलब्ध आकडेवारीनुसार त्यांनी एकूण ८२२६ गाणी गायली असा एक संदर्भ आहे. त्यात ५३२८ हिंदी चित्रपट गीते, १९८ गैरफिल्मी हिंदी गाणी, १२७ अप्रकाशित हिंदी चित्रपट गीते (म्हणजे जे हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले नाहीत), ४०५ मराठी गीते (त्यात मराठी चित्रपट आणि इतर), तसेच बंगाली, संस्कृत, गुजराती, पंजाबी वगैरे भाषेतील चित्रपटातील गाणी. या सगळ्याची बेरीज ८२२६ इतकी आहे. आता काही मराठी वृत्तपत्रांच्या संपादकांनी पंचवीस तर कोणी पन्नास हजार गाणी गायल्याचा आकडा कुठून आणला हा प्रश्न लताजींच्या निस्सीम चाहत्यांना आणि चित्रपट संगीत अभ्यासकांना पडला आहे. भारतीय चित्रपटाचा एकूणच अभ्यास हा सोपा विषय नाही हे यानिमित्ताने सांगावेसे वाटते. लता मंगेशकर हा असा एका लेखाचा अथवा स्फूट यांचा विषय नाही, तर त्यावर कितीही ऐकावे/सांगावे/गाण्याचे तपशील द्यावेत तितके थोडेच आहे.

लताजींच्या प्रगती पुस्तकातील चांगले गुण सांगावे तेवढे थोडेच. नायिका, गीतकार, संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक इतकेच नव्हे तर प्रेक्षकांचीही पिढी बदलली, पण त्यात लताजींची गायनाची वाटचाल दुतर्फा कायम राहिली. त्या चाळीसच्या दशकात गायन क्षेत्रात आल्या तेव्हा संपूर्ण चाळीत एकाद्याच्या घरी रेडिओ असे तर ग्रामीण भागात संपूर्ण गावात एकाद्या घरी रेडिओ असे आणि तेव्हा विजेची पुरेशी सुविधा उपलब्ध नव्हती. तरीही लताजींच्या गाण्यांचा रसिकांनी आनंद, आस्वाद घेतला. त्या काळात ग्रामोफोन घरी असणे प्रतिष्ठेचे मानले जाई. लाॅन्ग प्ले आणि इपी अशी तबकडी विकत घ्यावी लागे. मग रेडिओ आणि ट्रान्झिस्टर यांचा हळूहळू प्रसार वाढला. मुंबईत इराणी हाॅटेलमधील जुक्स बाॅक्समध्ये दहा पैशाचे नाणे टाकून आवडते गाणे ऐकावे लागे. मग त्याचे चार आणे म्हणजे पावली झाली. सत्तरच्या दशकात आठ आणे झाले. दूरदर्शन, रंगीत दूरदर्शन व व्हीडिओ, उपग्रह वाहिन्या, कॉम्प्युटर अशी तांत्रिक प्रगतीसह लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा प्रवास सुरू राहिला. त्या आवाजाला शिळेपण आले नाही. मोबाइलची काॅलरट्यून आणि रिंगटोन यातही लता मंगेशकर कायम आणि यू ट्यूबवरही लता मंगेशकर हुकमी.

अर्थात, या सगळ्या बदलत्या माध्यमातून एकूणच सर्वभाषिक चित्रपट संगीताचा प्रवास, प्रभाव आणि प्रवाह कायम राहिला. एका पिढीतील गाणी त्या चित्रपटाना गाण्यासह पुढील अनेक पिढ्या ओलांडूनही हिट राहिली. तरी म्हणे, चित्रपटात गाणी कशाला हवी? असे म्हणणारे अरसिक असावे. अथवा किमान लता मंगेशकर यांच्या गायनाचा त्यांनी आस्वाद घेतला नसावा. लताजींच्या गायनाने तब्बल सात दशके अनेकांचे आयुष्य समृद्ध केले आहे. त्यांच्या जगण्याला अर्थ, आनंद आणि कुठे आधारही दिला आहे. लता मंगेशकर हा कदापिही न संपणारा असाच एक महत्त्वाचा आणि सखोल विषय आहे. त्याचा अभ्यास करावा तेवढा थोडाच होईल. सतत नवीन काही पैलू जाणवतात हे त्यांचेच यश आहे.

लताजी गायिका म्हणूनही श्रेष्ठ आणि व्यक्ती म्हणूनही ग्रेट. मनोरंजन क्षेत्रात यशाने अनेक जणांची व्यक्तिमत्त्वे अंतर्बाह्य बदलतात (काहींची बिघडतातही याच्या अनेक कथा-दंतकथा प्रचलित आहेत.) पण दीर्घकालीन यशस्वी वाटचालीनंतरही आपले मूळ व्यक्तिमत्त्व, स्वभाव आणि सकारात्मक दृष्टिकोन अजिबात बदलला नाही, अशा एकाद्या भारतरत्न लता मंगेशकरच.

…एक न संपणारा नि संपूच नये असा विषय.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -