मनस्विनी – पूर्णिमा शिंदे
शारदीय नवरात्र उत्सव निमित्त देवी शारदेला वंदन. महिषासुरमर्दिनी, नवदुर्गा, अंबेमाता, भवानी, जगदंबा ही सगळी आदिशक्तीची रूपे स्त्रीमध्ये दडलेली आहेत. तिच्या कर्तृत्वाला सलाम! सलाम तिच्या संयमाला!! आज सर्वच क्षेत्रात तिने आकाशाला गवसणी घातली आहे. सर्व क्षेत्र पादाक्रांत केलीत. ती शिकली म्हणून नाही, तर ती शहाणी पहिल्यापासून आणि आजही शहाणीच होती. उंबरठ्याच्या आत चौकटीत तिला बंदिस्त करून गुलाम बनवले तरी देखील ती चंद्रावर पोहोचलीच. तिच्या पाठी आणि पोटी दिली ओझी न पेलणारी तरी ती तक्रार न करता कधीच वाकली नाही. पाठबळ असो किंवा नसो ती कायम पुढे सरसावली. ती माऊली होती सावली झाली. पण कधीही बाहुली नव्हती. तिची जिद्द, तिची हद्द तिच्या खडतर आयुष्यातही तिने आभाळ उसवलं तरी कणभर सुखासाठी मणभर दुःख पदरात घेतलं. आणि आयुष्यभराची खडतर मार्गाची परिक्रमा संघर्षातून केली. दिला तिने खांद्याला खांदा म्हणूनच उज्वल झाले उद्याची भविष्य, नाती आणि प्रगती. नाही थांबली तिची भ्रमंती.
आताही तिची क्रांती. कारण पहिली तिला जन्म देते म्हणून माता !दुसरी जन्माला भेटते म्हणून पत्नी!! तिसरी पोटी जन्म घेते म्हणून लेक. तिच्या आयुष्यात येणाऱ्या आणि जीवाचं रान करणाऱ्या, जीव लावायला, जीव द्यायला शिकवणाऱ्या या दासी, उपभोग्य वस्तू, अबला ठरू शकतील? नाही ना ! संस्कार, प्रेम आणि सुख देणाऱ्या या स्त्रियाच असतात. पण या स्त्रिया केवळ यंत्र किंवा उपभोग्यदासी किंवा लेच्यापेचा अबला नाहीत. मर्दानी, स्वयंसिद्ध ठरल्या.
वंशाला दिवा मुलगाच हवा पण पणतीलाही प्रकाशाचा हक्क द्यावा. तीही माणूसच आहे. ही पणती तेवणारी ज्योती दोन्ही कुटुंबाचा प्रकाश कायम टिकविणारी, तिच्या सहिष्णुतेची पराक्रमाची, संयमाची, संघर्षाची, कर्तृत्वाची आणि यशाची कोणी बरोबरी करू शकणार नाही. कारण स्त्री आहे आणि स्त्री “माणूसच” आहे. प्रत्येक देवीचा अंश तिच्यामध्ये आहे. आज नवरात्रीमध्ये आपण फक्त उपवास धरून अनवाणी चालतो. ही पूजा नाही तिचा आदर, सन्मान, तिच्या कर्तृत्वाचा सन्मान म्हणजे देवीची खरी पूजा! तुम्हाला खरी पूजा बांधायची असेल तर घराघरात राबणा-या लक्ष्मीला, शिकविणाऱ्या सरस्वतीला, लढणाऱ्या दुर्गेला, वाचवणाऱ्या अंबेला, क्षणाक्षणाला संघर्षाला सामोरे जाणाऱ्या नवदुर्गेला सलाम करा. हीच या शारदीय नवरात्र उत्सव प्रसंगी सर्वांसाठी प्रार्थना. तिचा अपमान होत असताना ती काही कळसूत्री बाहुली नाही. ती पायदळीची माती नाही. तिलाही मन आहे. भावना आहेत. लिंगभेदामुळे मुलींची गर्भात हत्या होत होती.
जन्मानंतर नखे देऊन मुली अर्भके मारली जात आणि आता तर मंदिरात, ज्ञानमंदिरात, बस, लोकल, रस्त्यावर, घरादारात चार वर्षापासून ते ७० वर्षाच्या वृद्धांपर्यंत महिला सुरक्षित नाहीत. याचीच चिंतनीय बाब म्हणून लाज वाटते. स्वातंत्र्याची ७५ अमृत महोत्सव साजरा केला. पण या स्वातंत्र्यांमध्ये आपल्याला महिलांना स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने मिळाले आहे का? तिच्या व्यथा, वेदना, दुःख अजूनही तितकीच धारदार आहेत. स्त्रियांच्या बाबतीत घडणाऱ्या सर्वच घटना मन हेलावून टाकणाऱ्या आहेत. आज प्रगतीच्या टप्प्यावर देश असताना देखील सर्वच क्षेत्रात मानाचे, सन्मानाचे स्थान तिने स्वकर्तृत्वावर मिळवले तरी सुद्धा तिला हीन लेखले जाते.
का? ती “माणूस “नाही? बाई माणूस मधलं “बाई “पण काढून टाकले तर फक्त “माणूस” फक्त माणूस… म्हणून तिला तिचा दर्जा द्यायला हवा. तर आणि तरच शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या जोमाने, जोशाने उत्साहाने साजरा करण्याचा आपल्याला अधिकार आहे. अन्यथा जिथे महिला सुरक्षित नसतील तेथे त्यांची सुरक्षा मिळावी. कायद्याने त्यांचा न्याय, सत्याच्या बाजूने विचार व्हावा. अत्याचार, अन्याय, जुलूम यांना वाचा फोडावी. अपराध्यास नराधमास पाशवी कृत्य करणाऱ्यास तात्काळ सजा व्हावी. म्हणजे काळ सोकावणार नाही. आणि इथून पुढे देखील महिलांचे जीणं सुकर होईल. बलात्काऱ्यास तात्काळ फाशी व्हावी. अद्दल घडावी. भर चौकात त्याचा चौरंग व्हावा. आपल्या लेकी, बाळी, सुना सदा सुखी राहाव्यात. प्रत्येकीमध्ये देवी आहे. त्या देवीला ओळखा आणि मगच देवीची आराधना आणि प्रार्थना करण्याचा तुम्हाला अधिकार आहे.