Monday, October 7, 2024

आसक्ती

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

माझी मैत्रीण खूप आग्रहाने मला एका ‘सत्संग’साठी घेऊन गेली. तिथे एक बाई खूप उत्कृष्टपणे जीवनामध्ये कोणत्या गोष्टींविषयी बोलत होती. तिचा अभ्यास, तिचा वक्तृत्व, तिचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन, तिचा प्रत्येक भाव सर्वांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याची तिची कला, ही खरोखरी वाखाणण्याजोगी होती. मी पहिल्यांदाच ‘सत्संग’ ही सभा काय हे अनुभवत होते. त्या बाई, ज्या जागी बसल्या होत्या त्यांच्या मागे लावलेले काही फोटो, आजूबाजूचे वातावरण, त्यांच्यासमोर बसलेला जनसमुदाय, त्या सर्वांची तिच्याविषयीची भावना, ते सर्व त्या सत्संगामधून घेत असलेले ज्ञान, त्यांनी विचारलेले प्रश्न त्या प्रश्नांना तिने दिलेली उत्तरे या सगळ्यांमध्ये मी रमून गेले होते. मनात आले कमीत कमी जेव्हा रिकामा वेळ असेल तेव्हा इथे आल्यास नक्की काहीतरी बौद्धिक खाद्य मिळू शकेल! सभा संपली. पांगापांग झाली. माझी मैत्रीण त्या बाईकडे मला घेऊन गेली आणि माझी ओळख तिला करून दिली. ती बाई माझ्याकडे पाहून गोड हसली आणि म्हणाली, “येत जा सत्संगला.” मीही होकाराची मान डोलावली. मग त्या बाईने मला विचारले,

“तू घातलेला हा पंजाबी ड्रेस कुठून खरेदी केलास?” मी तिला दुकानाचा पत्ता दिला. ती म्हणाली,
“तू जेव्हापासून समोर येऊन बसलीस तेव्हापासून मी या ड्रेसकडे पाहत होते. या लाल रंगाच्या ड्रेसवर अशी पांढरी गुलाबाची फुलं फारच उठून दिसतात. माझं सारखे त्याकडं लक्ष जात होते.”

मी हसून ‘थँक्स’ म्हटले. तेथून निघाले. रस्त्यावर चालताना विचार करत होते. पांढरे वस्त्र परिधान करणारी ही स्त्री, ‘आसक्ती’ या विषयावर सत्संग करत होती. तिच्या मनात ही कोणती आसक्ती? माझ्या कपड्यात तिचे मन गुंतले होते नव्हे तिला माझ्यासारखे ते कपडे खरेदीही करायचे होते. मग आज तिने ‘आसक्ती’ या विषयावर मांडलेली सगळी उदाहरणे ही फक्त सांगण्यासाठीच होती का? ती तिने स्वतःत भिनवलीच नव्हती?

मी सांगितलेल्या दुकानातून तिने ते कपडे कदाचित खरेदी केले असतील. ते अंगात घालून ती कोणत्या तरी समारंभात मिरवलीही असेल! असो. पण यानिमित्ताने मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले होते.

लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण!

आपल्या सगळ्यांच्या बाबतीत हे कळत-नकळत घडत असते. एखादा माणूस एखाद्या विषयावर कसा खोटा बोलला, हे आपण चिडून कोणाला तरी सांगत असतो. आपण खोटे बोलतो का किंवा कधी बोललो आहे का किंवा कधी बोलणारच नाही? याची कोणतीही गॅरंटी तो हे चिडून बोलताना देऊ शकतो का? हा शेवटी प्रश्नच उरतो.

मग ‘आसक्ती’ या शब्दाचा नेमका अर्थ काय, हे शोध घेण्याचे ठरवले असता या शब्दाचा समानार्थी अर्थ म्हणजे – लालसा; हाव; लालूच; हव्यास; लोभ; लंपटता; सोस; तत्परता; व्यासंग; तल्लीनपणा, असा शब्दकोशात सापडला. तो जीवनात पाहिलेल्या उदाहरणांवरून पटलासुद्धा!

मात्र अधिक खोलात जाताच ‘आसक्ती’ या शब्दाचे आणखीही काही अर्थ सापडले ते म्हणजे भक्ती; प्रेम; अनुराग; प्रीती; गोडी.

हे अर्थ वाचल्यावर मी विचारात पडले. ‘देव’ हेच सर्वस्व समजणारी काही माणसे असतात आणि ते अहोरात्र पूजापाठ वा तत्सम काहीसे करत असतात. त्यांचा हा भक्तीभाव म्हणजे आसक्तीच नाही का? किंवा माणूस माणसावर जे प्रेम करतो मग आईचे मुलांवरचे असो वा मुलांचे आईवरचे, स्त्रीचे पुरुषासंबंधी असो वा पुरुषाचे स्त्रीसंबंधी यात प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको, बहीण – भाऊ, मित्र-मैत्रीण वा कोणतेही नाते आपण घेऊ शकतो. इतकेच नव्हे तर मुक्या प्राण्यांचे माणसांवरील प्रेम आणि माणसांचे त्यांच्यावरील प्रेम हेही आपण गृहीत धरू शकतो. त्यामुळे आसक्तीचे हेही अर्थ हळूहळू लक्षात येऊ लागतात आणि सहज पटतातही!

आता आपण प्रत्यक्ष उदाहरणांकडे परत येऊया. दहीहंडी उत्सवाच्या आदल्या दिवशी रस्त्यात एक मैत्रीण भेटली. तिच्या हातात दोन जड बॅगा होत्या. मी तिला सहज विचारले, “काय एवढं खरेदी केलंस?” तर ती म्हणाली, “दूध घेऊन ठेवले आहे, पुढच्या चार दिवसांसाठी! उद्या दहीहंडी आहे. मोठ्या प्रमाणात दूध-दही वापरलं जाईल मग थोडं जास्तीचं घेऊन फ्रीजमध्ये ठेवलंले बरं!”

एका शाळेतील मित्राचा फोन आला – “गांधी जयंतीच्या निमित्ताने सुट्टी आहे. त्या दिवशी संध्याकाळी आपला संपूर्ण ग्रुप भेटतोय माझ्या घरी तर तू पण ये.” मी त्याच्या घरी गेले तेव्हा त्याने दोन-तीन बियर आणि व्हिस्कीच्या बाटल्याही समोर ठेवल्या होत्या. त्या पाहून एका मित्राने विचारले, “अरे बाबा, चक्क ड्राय डेला आज कसे काय हे जमवून आणलेस?”

तर तो म्हणाला, “गांधी जयंतीच्या चार दिवस आधीच आणून ठेवल्या.”
म्हणजे एखाद्या गोष्टीची साठवणूक करणे मग ते दूध असो की दारू, हीसुद्धा त्या वस्तूविषयीची आसक्तीच नाही का?
तर शेवटी काय इथून तिथून सगळी माणसे सारखीच! एखाद्याला कदाचित दुधाची आसक्ती असू शकते, तर दुसऱ्यास दारूची. एखाद्यास कपड्यांची आसक्ती असू शकते, तर दुसऱ्यास खाद्यपदार्थांची. एखाद्याला भरमसाट वस्तू खरेदीची तर एखाद्याला खोट्या दिखाव्याची! प्रत्येक माणसाला कसली तरी आसक्ती असतेच! कितीही सत्संगांना गेलो तरी शेवटी आसक्तीपासून सत्संग ऐकणाराच काय पण सत्संग करणारासुद्धा अलिप्त राहू शकत नाही, हे लक्षात आले. सरते शेवटी ‘आसक्ती’ या शब्दाचा अर्थ ‘व्यासंग’ हाही आहे, वाचून खूप बरे वाटले! व्यासंग हा शब्द खूपच सकारात्मकतेकडे वळलेला आहे. एखाद्या विषयाच्या सर्व अंगांचे ज्ञान व्हावे म्हणून बारकाईने केलेले अवलोकन, वाचन इत्यादी म्हणजे व्यासंग, तर मग ही आसक्ती मात्र प्रत्येकाकडे असायलाच हवी!

एखाद्या माणसाविषयीचे कौतुक किंवा गौरवोद्गार काढताना ‘तो माणूस व्यासंगी आहे’, असे म्हटले जाते. तो व्यासंग साहित्य, कला वा आणखी कोणत्याही क्षेत्रातला असू शकतो! त्यामुळे आपण आसक्ती या शब्दाकडून केवळ हव्यास, लोभ हे अर्थ न घेता प्रेम, व्यासंग हे शब्द मुळातून जाणून घेऊया. आपल्यालाही कोणी ‘प्रेमळ’ आणि ‘व्यासंगी’ म्हणावे या दृष्टीने कृती करूया!

pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -