मुंबई (प्रतिनिधी) : ऑगस्ट २०२४ मध्ये ट्रकच्या मालवाहतूक भाडेदरात वाढीचा कल कायम राहीला असून, सलग दुसऱ्या महिन्यात त्यात वृध्दी झाल्याचे श्रीराम मोबिलिटी बुलेटिनच्या ताज्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. आगामी सणासुदीच्या हंगामामुळे आणि निवडणुकीनंतर आर्थिक उलाढालींच्या वाढलेल्या वेगामुळे विविध वाहतूक मार्गांवर मालवाहतुकीच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे, भारत-बांगलादेशच्या सीमा प्रदेशात मालवाहतूक वाहन ताफ्याच्या वापरात लक्षणीय सुधारणा झाली आहे. वापर ४०टक्केवरुन ६० टक्केपर्यंत वाढला आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील व्यापार पुर्ववत झाल्याने कोलकाता-गुवाहाटी-कोलकाता मार्गावरील ट्रक मालवाहतूक दरात वाढ झाली असून ती सर्वाधिक ३.० टक्के नोंदविली गेली आहे. दिल्ली-कोलकाता-दिल्ली आणि दिल्ली-हैदराबाद-दिल्ली या मार्गांवर देखील अनुक्रमे २.७ टक्के आणि २.३ टक्के वाढ झाली आहे.
सफरचंदाचा हंगाम आणि विधानसभा निवडणुक मतदानाअगोदर श्रीनगर भागात मालवाहतुकीचे दरात वाढ सुरु झाली आहे. या भागात ऑगस्टमध्ये मालवाहतुकीचे दर जवळपास १० टक्के वाढले आहे. वायनाड प्रदेशात ट्रकची संख्या घटल्यामुळे मालवाहतुकीच्या दरात वाढ झाली आहे. तेथे बरेच ट्रक हे पुनर्वसन कार्यात गुंतलेले आहेत.