काठमांडू : महाराष्ट्रासह इतर राज्यातही परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याचं दिसत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशातच नेपाळमध्ये पडणाऱ्या परतीच्या पावसाने कहर (Nepal Flood) केला आहे. नेपाळमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामध्ये १००हून अधिक जणांचा मृत्यू झाला. तर काही जण अडकल्याची शक्यता असून बचावकार्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन-तीन दिवसांपासून नेपाळमध्ये संततधार कोसळत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली असून भूस्खलनाच्या घटनाही घडत आहेत. या घटनांमध्ये आतापर्यंत तब्बल ११२ लोकांचा मृत्यू झाला. इतर लोकांना वाचवण्यासाठी ३००० सैनिक तैनात करण्यात आले आहेत. ज्यांनी आतापर्यंत हजारो लोकांची सुटका केली आहे.
दरम्यान, मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये ४४ ठिकाणी महामार्ग रोखण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना वाहतुकीत अडचणी येत आहेत. तसेच या काळात हजारो लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.