Monday, October 7, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलग्रंथसखा : कविता आणि काव्यकोडी

ग्रंथसखा : कविता आणि काव्यकोडी

ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी
तुकारामांची गाथा
एकनाथांचे भागवत
वाचायचे आहे आता

व्यासांचे महाभारत
वाल्मीकींचे रामायण
रामदासांचा दासबोध
वाचायला उत्सुक मन

मोरोपंतांची केकावली
विनोबांची गीताई
कालिदासांचे शाकुंतल
वाचायची मला घाई

टिळकांचे गीतारहस्य
रवींद्रनाथांची गीतांजली
गदिमांचे गीतरामायण
वाचायची इच्छा झाली

सावरकरांचे माझी जन्मठेप
खांडेकरांची ययाती
अत्रेंचे कऱ्हेचे पाणी
वाचायला घेणार हाती

अष्टदर्शने, श्यामची आई,
जैत रे जैत, अपूर्वाई
विशाखा, सलाम, मेंदी
वाचायची अशीही काही

पुस्तके जरी छोटी मोठी
विचार नवा देतात
ग्रंथसखा होऊन आपले
आयुष्य घडवतात

काव्यकोडी – एकनाथ आव्हाड

१) मंगळला दोन
गुरूला त्रेसष्ट
शनीला मात्र
साठापेक्षा जास्त

बुध व शुक्रला
एकही नाही
ग्रहाभोवती कोण बरं
सदा फिरत राही?

२) डोक्यावर बसणे
डोळ्यांत खुपणे
छाती दडपणे
हात आखडणे

शब्दशः अर्थापेक्षा
वेगळा अर्थ कळे
भाषेचे सौंदर्य
खुले कुणामुळे ?

३) भूदानाचा मंत्र त्यांनी
भारतीयांना दिला
‘सर्वोदय’ हा उन्नतीचा
मार्ग सांगितला

‘गीताई’तून भगवद्‌गीतेचा
अर्थ सोपा केला
‘सब है भूमी गोपाल की’
हा संदेश कुणी दिला?

उत्तर –

१) उपग्रह 
२) वाक्प्रचार 
३) विनोबा भावे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -