
नक्षत्रांचे देणे - डॉ. विजया वाड
फार चढली आहे ती.” “पोर्शन पुरा करीत नाही.” “पाठ्यपुस्तक शिकवीत नाही.” “मुलांसाठी वेगळा पेपर काढते.” शिक्षक वेगवेगळ्या तक्रारी घेऊन हेड गुरुजींकडे आले होते. ३३ चा स्टाफ. १ हेमा नि १ उपहेमा. ती सोडून ३० जणांचा ६० तोंडाचा टीचर्सचा ताफा. “तुम्ही गप्प बसलात, तर मला बोलता येईल ना?”
“इतिहासाच्या पेपरला शाळा नि भोवताल, मराठीच्या पेपरला म्हणींवरून गोष्टी! अरे काय आहे काय?” “आओ जाओ, घर बनाओ, शिक्षाके नामपे कुछ भी सिखाओ!” …“ये नहीं चलेगा.” “तुम्ही तिला डोक्यावर चढवून ठेवली आहे.” “ये नहीं चलेगा.” “हरगीज नहीं चलेगा.” “आम्ही आंदोलन करू.” “पेपरात लिहून आणू.”
“थोर नेत्याचं नाव धारण करणाऱ्या शाळेतला धांगडधिंगा चव्हाट्यावर आणू.” “आम्हाला कमी समजू नका.” “आम्ही पण पोहोचलेले आहोत.” शिक्षकवृंद तापला होता. हेमांनी उपहेमांना इशारा केला. ते समजले. शिक्षकांना कसे शांत करायचे, त्यांची कला त्यांना अवगत होती. “मी बोलू का?” “बोला ना!” “मी बाईंना बोलावतो. त्यांची बाजू पण ऐकून घेऊया ना.” “हो. बोलवा. मऊपणे बोलू नका.” “चांगलं खडसावून विचारा.” “काय चाललंय काय?” शिक्षक उपहेमांना ‘शिकवू’ लागले. हल्ली नव्या शिक्षणपद्धतीत शिक्षक हा महत्त्वाचा मुद्दा झाला आहे फार. “तुम्ही असं करा उपहेमा.” वऱ्हाडेबाई म्हणाल्या.
“काय करू? तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे.” बाईंना काही उपहेडमास्तरांचा कावा कळला नाही. “तुम्ही सर इन्सपेक्टरलाच बोलवा! शिक्षणाधिकारी आले की, नांगी ठेचतील ते.” बाई बोलल्या. उपहेडमास्तर-उपहेमा अत्यंत आनंदले. त्यांनी तातडीने फोन लावला. हल्ली शाळा ‘ऑल वेल’ चालतात.
कुणी शिकवतात, कुणी वाचून घेतात. कुणी नुसतेच बसतात. मुले गोंधळ करतात. त्यांना गोष्टीची पुस्तके वाचनालयातून आणून देतात. कुणी आलेच तर सांगतात, “त्यांचं सामान्यज्ञान वाढवतोय.” “त्यांचं जनरल नॉलेज विस्तृत करतोय.”
“मुलांनी वाचायचं कधी? एक्स्ट्रा रिडिंगला खूप मूल्य आहे ना सर नवशिक्षणात.” बिचारे उपहेमा गप्प होतात. तर असा एकूण प्रकार त्याही नामवंत शाळेत होता.
नामवंत असली म्हणून काय झालं? १०वीच्या रिझल्टवर शाळेचं नाव मोठ-मोठं होतं. नावाजत किंवा खड्यात जातं. १० वीला व्यवस्थित शिकवलं की झालं. १० वीचे शिक्षक सजग असत. छोटी-मोठी मदत परीक्षेला स्टूडंट कम्युनिटीला करीत तीही करे.
पण अख्खा पेपर तिने वर्गास सांगितला? कहरच झाला. इन्सपेक्टर आले. ती पुढ्यात बसली. “नमस्ते सर.” “तुम्ही म्हणे परीक्षेचा पेपर वर्गात सांगितला! काय हो हे बाई?” “सांगितला. पण ऑप्शनसकट पाठ करायला लावला.” “असं करणं पाप आहे.” “एज्युकेशनची व्याख्या ‘टु अंडरस्टँड’ अशी असेल, तर मी काही चुकीचं वागले, असं मला वाटत नाही सर.” “मग परीक्षेला काय अर्थ राहिला बाई.”
“अहो सर, हल्ली उच्च स्पर्धा परीक्षांना बुकं वापरायची परवानगी देतात. तुम्ही तर सर्वज्ञानी!” तिने सरांना चढवले. त्यांना ते कळले. पण बरे वाटले. स्तुती कोणाला आवडत नाही! त्यांनाही मनोमन छान वाटले.
“मी किनई, सकाळी पेपर देते. विदाऊट फेल! पाठ करा सांगते.” ती बोलू लागली. “विद्यार्थी खूप अभ्यासतात. पेपर छानच जातो. प्रत्येकाला शेवटी शिक्षण हा आत्मविश्वास वाढवणारा घटक असेल, तर माझी पद्धसडत ही ‘सुखाचे झरे’ निर्माण करणारी आहे सर.” ती शांत, समाधानी होती. साहेब खूश होते.