Sunday, October 6, 2024
Homeसाप्ताहिककोलाजनवरूपे देवीची...

नवरूपे देवीची…

आपापले कर्तव्यपालन करणाऱ्या घराघरांतल्या सामान्य स्त्रीमध्ये देवीचे रूप तर असतेच, पण त्या देवीच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार घराप्रमाणे सामाजिक बांधिलकीही सांभाळणाऱ्या गृहिणींमुळे होतो!

विशेष – डॉ. अनुराधा कुलकर्णी

(विद्यावाचस्पदी संत वाङ्मय अभ्यासिका)

नवरात्रीला नवरूपे तू घेऊनिया
येशी। जय अंबे जगदंबे…

एकाच अंबेची नऊ रूपे कशी असतील बरे! तेव्हा मनात आले, पहाटे ४ चा गजर लावून धडपडत उठणारी, स्वतःचा, नवऱ्याचा, दिराचा डबा तयार करून, सासु-सासऱ्यांच्या, मुलांच्या जेवणाची व्यवस्था करून, टापटिपीने, प्रसन्नतेने ८-५० ची लोकल पकडणारी, लोकलच्या मरणाच्या गर्दीतही मैत्रिणींचा कोंडाळा निर्माण करणारी, आफिसमध्ये कॉम्प्युटरच्या किबोर्डवर लीलया बोटे फिरविणारी, घरी येताना आठवणीने दुसऱ्या दिवसाच्या मेनूप्रमाणे खरेदी करीत येणारी, छोट्याशाच का होईना पण देव्हाऱ्यात तिन्हीसांजेला तेलवात करणारी आजची स्त्री ही देवीचे रूप दाखवत नाही का?

आपापले कर्तव्यपालन करणाऱ्या घराघरांतल्या सामान्य स्त्रीमध्ये देवीचे रूप तर असतेच, पण त्या देवीच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार घराप्रमाणे सामाजिक बांधिलकीही सांभाळणाऱ्या गृहिणींमुळे होतो! गुजरातच्या भूकंपाच्या वेळी एक महिला डॉक्टर स्वतःची युरोप ट्रीप बुक केलेली असतानाही ती कॅन्सल करून त्याऐवजी गुजरातला गेली आणि तिने तेथील जखमी लोकांवर अहोरात्र उपचार केले! तिच्यात त्या जखमी लोकांना देवीचेच दर्शन झाले असेल ना…!!

अष्टावधानी स्त्री ही अष्टभूजा देवीचेच प्रतीक. एखादी सर्वसामान्य स्त्री पोळ्या करता करता, एका मुलीच्या गणितातल्या अडचणी सोडवत, दुसरीचे इंग्लिशचे स्पेलिंगही घेते. त्याचवेळी भांडीवाल्या काकूंना सूचना देत, शेजारच्या बाईची बिघडलेली रेसिपी कशी नीट करायची, ते सुद्धा सांगते. सगळीकडे लक्ष ठेवते. सर्वांमध्येच असलेल्या दैवी चैतन्यशक्तीचेच हे रूप. सर्व देवांच्या ठिकाणी असलेल्या आत्मशक्तीलाच देवी हे नाव मिळाले. तीच जग निर्माण करणारी आदिमाया समजली गेली. देवीची महत्त्वाची रूपे म्हणजे महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली. या तिन्ही देवी दुर्गेमध्ये एकरूप
झाल्या आहेत.

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी
किती सुंदर अर्थ आहे या आरतीचा! हे दुर्गामाते, तुझ्याशिवाय हा संसार दुर्घट म्हणजे कठीण आहे. खरेच सरस्वती म्हणजे ज्ञान, लक्ष्मी म्हणजे धन आणि काली म्हणजे शक्ती या तिघांविना जीवन जीवनच राहणार नाही! अंतराळविश्व गाजविणारी सुनीता विल्यम म्हणजे आजची दुर्गाच म्हणता येईल. आता महासरस्वतीचे स्वरूप बघू. सरस्वती म्हटले की, तिचे ते सुरेख स्तोत्र आठवतेच,

या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा।।

कुंदाची फुले, चंद्र व हिमतुषार यांच्यासारखा जिचा वर्ण आहे, जी शुभ्र वस्त्रांनी आवृत्त आहे, जिचा हात सुंदर वीणेने अलंकृत आहे, जी श्वेत कमळावर बसली आहे, जी ब्रह्मा, विष्णू, महेशादी देवगणांना सार्वकाल वंदनीय आहे, जी सर्व प्रकारच्या जडतेचा नाश करणारी आहे, अशी सरस्वती देवी माझे रक्षण करो.
महालक्ष्मीचं वर्णन श्रीसूक्तात खालीलप्रमाणे आहे,

ॐ हिरण्यवर्णांहरिणींसुवर्णरजतस्त्रजाम् ।
चंद्रांहिरण्मयींलक्ष्मींजातवेदोमआवह । तांमआवहजातवेदोलक्ष्मीमनपगामिनीम् ।
सोनरंगी, हरणासारखी चपळ, सोन्या-चांदीचे दागिने घातलेली, चंद्रासारखी शीतल अशी जी चिरस्थायी लक्ष्मी, तिला बोलाविण्याचे साकडे अग्निदेवाला घातले आहे.
अश्वपूर्वांरथमध्यांहस्तिनादप्रबोधिनीम्

घरात लपून-छपून येणारी लक्ष्मी नसून अलक्ष्मी असते. खरी लक्ष्मी तर रथावर आरूढ होऊन आपल्या लवाजम्यासह येते. ती जेव्हा येते तेव्हा हत्तींच्या चित्कारांनी तिचे आगमन लक्षात येते. अक्षय टिकणाऱ्या लक्ष्मीचा महिमा श्रीसूक्तात वर्णिला आहे. यात पुत्र, पौत्र, धन, धान्य संपन्नतेसाठी जशी लक्ष्मीची प्रार्थना केली आहे, तसेच क्रोध, मत्सर, लोभ, अशुभमती निर्माण न व्हावी म्हणूनही लक्ष्मीला प्रार्थिले आहे.

न क्रोधो न च मात्सर्यं न
लोभो नाशुभामतिः।।
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां
श्रीसूक्तं जपेत् ।।
अर्थातच सन्मार्गानेच धनप्राप्ती व्हावी, असत् भावाचे दारिद्र्य दूर व्हावे, असा विमल भाव यात आहे, सत्कार्याला सदैव मदत करणाऱ्या सुधा मूर्तीसारख्या दानशूर स्त्रिया म्हणजे लक्ष्मीचेच रूप नव्हे का?

दैत्यांना मारणारी ती महाकाली! इंग्रज सैन्याशी त्वेषाने लढणाऱ्या झाशीच्या राणीत महाकालीचे रूप दिसते! देवी जशी शौर्याची मूर्ती तशीच वात्सल्याचीही मूर्ती आहे.
माझी रेणुका माऊली कल्पवृक्षाची साऊली
भक्ताच्या हाकेसरशी उन्हातान्हात पायीपायी धावत येणाऱ्या रेणुकामातेला संत विष्णुदास नामा म्हणतात की,
खाली बैस घे आराम मुखावरती
आला घाम । विष्णुदास आदराने वारा
घाली पदराने…

आपल्या देवतुल्य पतीसह कुष्टपीडितांना मायेची पांखर घालणाऱ्या साधनाताई आमटे म्हणजे रेणुकामाऊलीच ना!
कोल्हापूरची अंबाबाई, एकवीरादेवी, कात्यायनीदेवी या साऱ्या आपल्या मायमाऊलीच वाटतात. आपल्या काळजाला चटका लावणारे देवीचे रूप म्हणजे महासती अंबेचे. तिचा पिता दक्ष याने आपल्याकडील यज्ञसमारंभासाठी जावई शिवाला वगळून सर्वांना आमंत्रण केले. तरीही सती पितृगृही गेली. तेथे कोणी तिची साधी विचारपूस तर केली नाहीच उलट तिच्या तोंडावर शिवाची निंदा केली. ती असह्य होऊन सतीने तेथल्या तेथे यज्ञकुंडात उडी घेतली!! ते वृत्त कळताच शिव तत्काळ तेथे गेले. दक्षाला ठार मारून त्यांनी यज्ञाचा विध्वंस केला आणि सतीचे शरीर खांद्यावर टाकून बेभान होऊन इकडे तिकडे हिंडू लागले. शिवाची ही अवस्था साऱ्या विश्वाचा नाश करेल म्हणून विष्णूने आपल्या सुदशर्नाने त्या शरीरातून देवीची एकावन्न रूपे जगाच्या कल्याणासाठी निर्माण केलीत. ही रूपे ज्या ज्या ठिकाणी पडली, ती सर्व ठिकाणे शक्तिस्थाने बनली! त्यामुळे शिवही शांत झालेत.

स्त्रीचा माहेरचा ओढा, सासरचा अभिमान आणि निर्मळ पावित्र्यामुळे आलेली अभंग तेजस्विता यातून प्रतीत होते, सतीने यज्ञात उडी घेतली तर ललितादेवी यज्ञातून प्रकट झाली. हा यज्ञ ब्रह्मदेवाने केला होता. ललितादेवीच्या व्रताने समृद्धी, सुखशांती मिळते, असे म्हणतात. देवीचे अजून एक रूप म्हणजे सप्तश्रृंगीचे. मधू, कैटभादी राक्षस खूप माजले होते. स्त्रियांवर, मुलांवर बेबंध अत्याचार करीत होते. त्यामुळे संतप्त होऊन देवीने त्या राक्षसांशी घनघोर युद्ध केले. त्यात सर्व राक्षसांचा निःपात झाला. पण देवीची क्षुब्धावस्था गेली नाही. ती तशीच सप्तश्रृंग गडावर जाऊन बसली. तिला शांत करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघे तेथे आले. त्यांनी देवीचे स्तवन करीत तिला पंचामृताचे स्नान घातले. मग देवी प्रसन्न बनली. भक्तांसाठी वरदायिनी झाली!

देवीची उपासना करणे म्हणजे आपल्याच मनातली सद्भावना जागृत करणे, आपल्यातल्या कार्यशक्तीला चेतना देणे, आपली सारासार विवेकबुद्धी सतेज करणे आणि निर्भीडपणे अन्यायाचा प्रतिकार करणे.

नमो देव्यै महादेव्यै शिवायै
सततं नमः ।
नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः
प्रणताः स्म ताम् ।।
आजच्या हिंसाचाराच्या आणि चंगळवादाच्या अशुद्ध वातावरणात आपल्याला जनशक्तिरूपी देवीलाच साद घालावी लागणार. जोपर्यंत सर्वसामान्य जनता अन्यायी परिस्थितीविरुद्ध जागृत होत नाही तोपर्यंत असाच हिंसाचार होत राहणार! एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे, त्यात ते लोकांच्या हृदयामधल्या महालक्ष्मीला दार उघडण्याचे आवाहन करतात,

नमो आदि माया भगवती ।
अनादि सिद्ध मूळप्रकृती ।
महालक्ष्मी त्रिजगती ।
बया दार उघड दार उघड ।।

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -