मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल
मुंबई : आरोपी गोळीबार करतो, मग पोलिसांनी त्यांची बंदूक फक्त प्रदर्शनाला ठेवायची का?, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधकांवर टीका केली.
बदलापूर प्रकरणातील (Badlapur Case) आरोपी अक्षय शिंदेच्या (Akshay Shinde) पोलीस चकमकीत झालेल्या मृत्यूवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “बदलापूर प्रकरण घडल्यानंतर आरोपीला फाशी द्या, असे विरोधक म्हणत होते. त्यानंतर आरोपी जेव्हा गोळीबार करतो तेव्हा पोलिसांनी बंदूक फक्त प्रदर्शनासाठी ठेवायची का? पोलिसांनी समजा ते केलं नसते तर विरोधकच म्हणाले असते की चार लोक असून आरोपी गोळीबार करून पळून गेला. मग पोलिसांची बंदूक काय प्रदर्शनासाठी ठेवली का? म्हणजे विरोधक इकडून पण बोलतात आणि तिकडूनही बोलतात”, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) हल्लाबोल केला.
पोलीस बंदोबस्तात अखेर अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर त्याचा मृतदेह पुरण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबियांनी घेतला. मात्र अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी जमीन देण्यास प्रत्येक ठिकाणी स्थानिकांकडून विरोध होताना दिसला. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने अक्षय शिंदेचा मृतदेह पुरण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत जागा उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश राज्य सरकारने दिले होते. न्यायालयाने दिलेल्या आदेशाला एक दिवस बाकी असताना आता अक्षय शिंदेवर उल्हासनगरमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.