Monday, September 15, 2025

Pune News : नवरात्रोत्सवासाठी चतु:शृंगी मंदिर सज्ज!

Pune News : नवरात्रोत्सवासाठी चतु:शृंगी मंदिर सज्ज!

देवीच्या अलंकारामध्ये यंदा सोन्याची नथ

पुणे : वैविध्यपूर्ण धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासह शारदीय नवरात्रोत्सवासाठी श्री चतु:शृंगी मंदिर सज्ज झाले आहे. मंदिरामध्ये गुरुवारीसकाळी नऊ वाजता शारदीय नवरात्रोत्सवाची घटस्थापान होत असून उत्सवादरम्यान मंदिर भाविकांसाठी दिवसरात्र अखंड खुले होणार आहे. घटस्थापना झाल्यानंतर एका भाविकाने दिलेली सोने आणि मोत्याने घडविलेली तीन लाख रुपये किंमतीची नथ देवीला परिधान केली जाणार आहे.

मंदिराचे व्यवस्थापक विश्वस्त देवेंद्र देवदत्त अनगळ यांच्या हस्ते गुरुवारी घटस्थापना आणि नवचंडी होम होणार आहे. उत्सवामध्ये सर्व दिवस अभिषेक, रूद्राभिषेक, महापूजा सुरू राहणार आहेत. दररोज सकाळी दहा आणि रात्री नऊ वाजता महाआरती होणार आहे, अशी माहिती ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचे कार्यकारी विश्वस्त श्रीकांत अनगळ यांनी दिली.

आजीचा भोंडला आयोजित

कार्यक्रमांमध्ये यंदा सुयोग मित्र मंडळातर्फे निवारा वृद्धाश्रमातील आजींसाठी खास आजीचा भोंडला आयोजित करण्यात आला आहे. परंपरेनुसार दसऱ्याला संध्याकाळी सीमोल्लंघनाची पालखी मिरवणूक निघेल. यामध्ये बँड, चित्रपट कलाकारांचा समावेश असलेले कलावंत ढोल-ताशी पथक, नगारा, चौघडा, भुत्ये, वाघ्या मुरळीसह, देवीच्या सेवेकऱ्यांचा सहभाग राहणार असून हेलिकॉप्टरमधून देवीच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, असे अध्यक्ष अमित अनगळ यांनी सांगितले.

मंदिर परिसरात २४ सीसीटिव्ही

भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पोलिसांचा ताफा तैनात राहणार आहे. मंदिर परिसरात २४ सीसीटिव्ही कॅमेरेही बसवले आहेत. युवराज तेली मेमोरिअल ट्रस्टने भाविकांसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आहे. सर्व भाविकांचा यात्रेसह संपूर्ण वर्षाचा दोन कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. देवस्थान ट्रस्टने ऑनलाइन दर्शन पासची व्यवस्था केली आहे. मंदिर परिसरातही ऑफलाइन दर्शन पासचे तीन दालन असतील, असे अनगळ यांनी सांगितले.

जीर्णोद्धाराचे काम सुरू

मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरू असून चाळीस टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम नवरात्रानंतर सहा ते आठ महिन्यांत पूर्ण करण्याचा मानस आहे. मुख्य मंदिरातील सभामंडपाचे काम पूर्ण झाले नसले तरी भाविकांना देवीचे व्यवस्थित दर्शन घेता येईल. नवीन सभामंडप पूर्वीच्या सभामंडपापेक्षा दुपटीने मोठा झाला आहे. त्यामुळे सभामंडपात प्रवेश केल्याबरोबर भाविकांना देवीचे दर्शन होईल, असे श्रीकांत अनगळ यांनी सांगितले.

Comments
Add Comment