ठाणे : ठाणे महापालिकेतर्फे गोल्डन डाईज नाक्याकडून भिवंडीकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यालगत असलेल्या अतिक्रमणावर धडक कारवाई करण्यात आली. त्यात, लोखंडी पत्र्याचे ०६ गाळे, ०७ टपऱ्या, सहा दुकानांच्याबाहेरील पत्र्याच्या शेड काढण्यात आल्या. सात हातगाड्याही जप्त करण्यात आल्या.
माजिवडा गोल्डन डाईज नाक्यावरून भिवंडीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुकानांच्या बाहेर सामान ठेवून रस्ता अडवून व्यवसाय करण्यात येत होता. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार करावाई करण्यात आली.
गॅरेज, प्लायवुडचे दुकान, भंगाराची दुकाने यांच्यावर कारवाई करतानाच, दुकानांबाहेर ठेवलेल्या वस्तूही जप्त् करण्यात आल्या. दुकानांबाहेरील अवैध शेड तोडण्यात आले. त्यासोबत, हातगाडी, फेरीवाले यांच्यावरही निष्कासन कारवाई करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत, उपायुक्त (परिमंडळ ३) दिनेश तायडे, सहाय्यक आयुक्त अलका खैरे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिम तडवी यांच्यासह परिमंडळ तीन मधील कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
या कारवाईत, या कारवाईत लोखंडी पत्र्याचे ०६ गाळे, ०७ टपऱ्या, सहा दुकानांच्याबाहेरील पत्र्याच्या शेड काढण्यात आल्या. सात हातगाड्या जप्त करण्यात आल्या. याचसोबत रस्त्यावर पडलेला कचरा, बांधकामाचा राडारोडा उचलण्यात आला. तसेच, अवैधपणे पार्किंग करण्यात आलेली वाहने हटविण्यात आली. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती उपायुक्त दिनेश तायडे यांनी दिली.