टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल
ख्यातनाम निर्माते व अभिनेते सुनील बर्वे यांच्या हरबेरीयम उपक्रमांतर्गत प्रा.वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आलेले आहे. प्रेक्षकांच्या मागणीनुसार याचे प्रयोग होत राहणार आहेत. केवळ मर्यादित २५ प्रयोगाची मर्यादा नाही.
सुनीलचे शालेय शिक्षण मुंबईतील गोरेगावमधील सेंट थॉमस शाळेत झाले, तर पाटकर कॉलेजमध्ये त्याचे पुढील शिक्षण झाले. ते बारावीत असताना दिग्दर्शक विनय आपटेंच्या ‘अफलातून’ नाटकात काम करू लागले. त्यामधून ते गायक, अभिनेते म्हणून ओळखले जाऊ लागले. तेथून त्यांचा टर्निंग पॉइंट सुरू झाला. दिग्दर्शक विनय आपटेंमुळे त्यांना नाटकाची ओळख झाली. तेथूनच त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. पदवी मिळविल्यानंतर एक महिनाभर त्यांनी नोकरी केली; परंतु पुढे त्यांचे मन रमले नाही, नंतर फुल्ल टाईम अभिनय ते करू लागले. वन रूम किचन, मोरूची मावशी, अफलातून या नाटकाचे जवळपास ७५० प्रयोग त्यांनी कॉलेज सुरू असताना केले होते. १९९० सालानंतर त्यांची अभिनयाची घौडदौड सुरू झाली.
चारचौघी, असेच आम्ही सारे, एकदा पाहावे करून, श्री तशी सौ, बायकोच्या नकळत, लग्नाची बेडी, हॅलो इन्स्पेक्टर, हीच तर प्रेमाची गंमत ही नाटके त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी चित्रपट, मालिका केल्या. आई, निदान, अस्तित्व, टीनू की टीना, स्वर गंधर्व सुधीर फडके हे चित्रपट त्यांनी केले. प्रपंच, अवंतिका, नूपुर, असंभव, कुंकू या मालिका केल्या. पारू ही त्यांची मालिका सध्या सुरू आहे. २०१० साली त्यांच्या अभिनयाच्या करिअरला २५ वर्षे पूर्ण झाली.त्यानिमित्ताने त्यांनी हरबेरीयम हा उपक्रम सुरू केला. तरुण पिढीने न पाहिलेल्या अजरामर काही नाटकांचे २५ प्रयोग सुबक या त्यांच्या निर्मिती संस्थेतर्फे सादर करण्याचे ठरविले. सूर्याची पिल्ले, हमीदाबाईची कोठी, लहानपण दे गा देवा, झोपी गेलेला जागा झाला, पती गेले गं काठेवाडी या नाटकाचे २५ प्रयोग सादर झाले. प्रेक्षकांनी या प्रयोगाला तुफान गर्दी केली. या व्यतिरिक्त त्यांनी त्यांच्या संस्थेतर्फे ‘नृत्य सजीव गीत रामायण’ हा कार्यक्रम केला. अमर फोटो स्टुडिओ हे अजरामर नाटक देखील त्यांच्या संस्थेतर्फे सादर केले गेले.
त्यांना अजूनही अभिनय शिकण्याची हौस आहे. अभिनय वेगवेगळ्या पद्धतीने करण्याची हौस आहे. सुबक या त्यांच्या निर्मिती संस्थेतर्फे पुन्हा एकदा प्रा. वसंत कानेटकर लिखित ‘सूर्याची पिल्ले’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. प्रा. वसंत कानेटकर यांचे हे गाजलेलं नाटक मार्मिक भाष्य करणार, विनोदी अंगाने जाणारं सामाजिक नाटक आहे. स्वातंत्र्य सूर्य आबासाहेब कोटी मास्तरांचे चार मुलं आहेत. अजूनही ते त्यांच्या वलयांमध्ये जगणारी आहेत. आबासाहेब परलोकी जाऊन वर्षे झालेली आहेत. त्यांची पुण्यतिथी साजरी करताना शेकडो लोकांनी त्यांच्या मुलांची भाषणे ऐकायला यावीत, अशी अपेक्षा ते बाळगून आहेत. त्याच भावनेतून ते जगताहेत. ते खुजी राहिलेले आहेत. त्यावर भाष्य करणारे हे नाटक आहे. आबासाहेब त्यांचा धाकटा मुलगा इतर भावंडांना सांगतो की, त्यांच्या वडिलांच्या वलयातून आपण सर्वांनी बाहेर पडलं पाहिजे. तरच आपण काही तरी करून दाखवू शकू. स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकू. अशा प्रकारे एका चांगल्या भाषेचे, चांगल्या लेखकाचे नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.