राजरंग – राज चिंचणकर
मराठी रंगभूमीवर ३१ वर्षांपूर्वी प्रशांत दळवी लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ हे नाटक आले आणि या नाटकाने इतिहास घडवला. दोन वर्षांपूर्वी हे नाटक नव्याने रंगमंचावर अवतरले आणि या नाटकाने पुन्हा एकदा रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. आता २९ सप्टेंबर रोजी, तब्बल ३३३ प्रयोगांची ‘हाऊसफुल्ल’ अशी त्रिशतकी खेळी खेळल्यावर या नाटकाने पूर्णविराम घ्यायचे ठरवले आहे. रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम व पर्ण पेठे या नाटकातल्या ‘चारचौघीं’नी तर हे नाटक गाजवलेच; परंतु त्यांच्यासह श्रेयस राजे, निनाद लिमये व पार्थ केतकर या तिघांच्या या नाटकातल्या भूमिकांनीही लक्ष वेधून घेतले. ‘जिगीषा’ नाट्यसंस्थेतर्फे निर्माते श्रीपाद पद्माकर यांनी हे नाटक रंगभूमीवर आणत ही ‘माईलस्टोन’ कलाकृती रसिकांसमोर नव्याने पेश केली. आता हे नाटक थांबत असतानाच, या चौघांच्या मनात असलेल्या भावनांचे हे प्रकटीकरण…
समाधानही आहे…
आम्ही हे नाटक मुळात एक किंवा दीड वर्ष करायचे ठरवले होते; पण सगळ्या कलाकारांनी आम्हाला वेळ दिला आणि हे नाटक आम्ही दोन वर्षे केले. नाटक अजूनही उत्तम चालत आहे. देशात आणि विदेशातही आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही रसिकांनी अनेकदा हे नाटक पाहिले आहे आणि ३१ वर्षांपूर्वीचे हे नाटक आताच्या पिढीलाही पाहता आले, यासाठी रसिकांनी आम्हाला धन्यवाद दिले आहेत. आम्ही सुद्धा सर्व रसिकांचे आभार मानतो की, त्यांनी आम्हाला इतका मोठा प्रतिसाद दिला. असे चालणारे नाटक थांबत असेल, तर दुःख नक्कीच होते. पण मी सगळ्या कलाकारांचा आभारी आहे; कारण इतर कुठेही व्यस्त न राहता त्यांनी या नाटकाला प्राधान्य दिले. शुभारंभापासूनच नाटकाने ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकावले आहेत. आता आमचे हे नाटक थांबत असताना दुःख तर आहेच; परंतु असे नाटक रंगभूमीवर केल्याचे समाधानही वाटत आहे.
– श्रीपाद पद्माकर (निर्माते)
खूप मोठा अनुभव…
‘चारचौघी’ या नाटकाने आयुष्यातला खूप मोठा अनुभव दिला. इतके मोठे माईलस्टोन नाटक जे ३१ वर्षांपूर्वी रंगभूमीवर आले होते; तेव्हा खरे तर माझा जन्मही झाला नव्हता. पण जेव्हापासून कळायला लागले, उमजायला लागले, नाटकासाठी काम करणे सुरू झाले; तेव्हापासून ‘चारचौघी’ नाटकाचे एक वेगळे स्थान रंगभूमीवर होतेच. हे नाटक वाचनात आले होते; पण याचे पुन्हा कधी प्रयोग होतील आणि या नाटकात काम करायला मिळेल, असे कधी वाटले नव्हते. मात्र असे म्हटले जाते की, स्वप्ने कधी कधी सत्यात उतरतात; तसेच काहीसे झाले. या नाटकाच्या निमित्ताने मोठ्या कलाकारांसोबत आणि मराठीतल्या खूप मोठ्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. कलाकार म्हणून आतापर्यंत जे काही मी शिकलो होतो; त्यात बऱ्याच गोष्टींची भर पडत गेली. एका कलाकाराला हेच हवे असते की, आपल्या वाट्याला कायम चांगले काम येत राहावे. ते माझ्या वाट्याला या वयात आले, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो.
– श्रेयस राजे (अभिनेता)
उत्साहवर्धक प्रतिसाद…
मला अतिशय आनंद आहे की, मी ‘चारचौघी’ या नाटकाचा एक भाग आहे. ‘जिगीषा’ नाट्यसंस्था, तसेच चंद्रकांत कुलकर्णी व प्रशांत दळवींचे मी खूप आभार मानतो की, त्यांनी मला या नाटकात भूमिका दिली. मी प्रेक्षकांचेही आभार मानतो, कारण त्यांनी ज्या पद्धतीने मला प्रतिसाद दिला; तो उत्साहवर्धक होता. तीनशे प्रयोग होऊनही हा प्रतिसादाचा ओघ काही कमी झाला नाही. तसे पाहायला गेल्यास, व्यावसायिक मराठी नाटक असे हे माझे पहिलेच आहे. त्यामुळे या नाटकाचे माझ्या मनात आणि आयुष्यात वेगळे स्थान आहे. ही एक उत्तम आठवण असणार आहे. आमच्या नाटकाची टीम इतकी चांगली आहे की, मला एक नवीन कुटुंब मिळाल्यासारखे वाटते. मी अत्यंत समाधानी आहे, संतुष्ट आहे आणि ऋणी आहे. आपण पुढेही चांगले काम करत राहू, असा विश्वास देणारे एखादे प्रोजेक्ट असते, तसे हे नाटक आहे.
– निनाद लिमये (अभिनेता)
महत्त्वाची संधी…
‘चारचौघी’ हे माझे पहिले व्यावसायिक नाटक आणि यानिमित्ताने इतक्या चांगल्या लोकांसोबत काम करण्याची संधी मला मिळाली, यासाठी मी खरेच मला नशीबवान समजतो. चांगले निर्माते, लेखक, दिग्दर्शक आणि इतके उत्तम सहकलाकार या प्रोजेक्टमुळे मला लाभले. या दोन वर्षांच्या काळात विविध क्षेत्रातली मान्यवर मंडळी आमच्या नाटकाला आली आणि या नाटकाच्या निमित्ताने मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. यापुढेही माझ्याकडून अशी उत्तम कामगिरी घडत राहील, याची खात्री आहे. नाटक बंद होण्याची जाणीव होणे, ही खरोखरच दुःखद गोष्ट आहे. एखादी गोष्ट संपली म्हणजे ती पूर्णतः संपली असे नसते; तर काही चांगल्या गोष्टींचा उगम तिथून होणार असतो. त्याप्रमाणे यापुढेही एखादे चांगले काम घेऊन मी तुमच्यासमोर नक्कीच येईन.