सोलापूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशीपूजा, चंदनउटी पूजा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना एक ऑक्टोबरपासून ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे.
या पूजेची नोंदणी करण्यासाठी मंदिर समितीने संगणक प्रणाली विकसित केली आहे. भाविकांना आता एक ऑक्टोबरपासून ऑनलाईन पद्धतीने पूजेची नोंदणी करता येणार असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.
मंदिर समितीच्या २० ऑगस्टच्या सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत हा निर्णय घेतला होता. ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्याचे काम पूर्ण झाले आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalrukminimandir.org या मंदिर समितीच्या संकेतस्थळावर करता येईल, असे शेळके यांनी सांगितले.