मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) घाटकोपर (पूर्व) येथील माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी ८ हजार ४९८ कोटींचा निधी मंजूर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या प्राधिकरणाच्या १५८व्या बैठकीत ही मंजुरी देण्यात आली. हजारो झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करणे आणि शाश्वत शहरी विकासाला चालना देणे, हे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
महाराष्ट्र शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाला (एसआरए) स्थानिक स्वराज्य संस्था आणि एमएमआरडीए, म्हाडा, सिडको यांसारख्या इतर संस्थांसोबत प्रकल्पांच्या संयुक्त अंमलबजावणीचे अधिकार दिले होते.
माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर येथील योजना एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या संयुक्त भागीदारी तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.
हा प्रकल्प ४८ महिन्यांत राबविण्यात येईल. या प्रकल्पांतर्गत, पात्र झोपडपट्टीधारकांना मोफत सदनिका उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे बगीचे, आरोग्य केंद्रे आणि शैक्षणिक सुविधा यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधा देखील विकसित करण्यात येणार आहेत. या योजनेमध्ये पूर्व मुक्त मार्गाचे विस्तारीकरणही समाविष्ट आहे. हा या भागातील एक महत्त्वाचा पायाभूत प्रकल्प आहे.
या मंजुरीबाबत सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबईतील झोपडपट्टीधारकांचे जीवनमान उंचावणे आणि पायाभूत सुविधांचा विकास करणे हे आमच्या सरकारचे उद्दिष्ट आहे. माता रमाबाई आंबेडकर नगर प्रकल्प शाश्वत शहरी विकासाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे.”
एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे म्हणाले, “ही झोपडपट्टी पुनर्वसन योजना हजारो झोपडपट्टीधारकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहेच, त्याचप्रमाणे आधुनिक, सर्वसमावेशक मुंबई आमच्या उद्दिष्टाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अशा प्रगतीशील उपक्रमांचे नेतृत्व आम्ही करत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे.”
मुख्य वैशिष्ट्ये
– एकूण भूखंड क्षेत्र: ३१.८२ हेक्टर
– प्रकल्पाचा एकूण खर्च: ८४९८ कोटी रुपये
– झोपडपट्टीधारक लाभार्थी: सुमारे १७,०००