फिरता फिरता – मेघना साने
महाराष्ट्रातील खेड्यांचा विकास साधण्यासाठी अमेरिकेतील ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’ ही संस्था कार्यरत आहे. त्यांचीच एक कार्यकर्ती, रेश्मा सांबरे ही मला महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुणे येथे झालेल्या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात भेटली. तिच्याशी संवाद साधून मी तिच्या कार्याबद्दल जाणून घेतले.
“स्त्रियांच्या आयुष्यात अनेक अडथळे असतात. समाजाची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी आणि समाजाकडून त्यांना मिळणारी वागणूक हा एक भाग असतो आणि स्वतःच्या गुणांबद्दल, प्रगतीबद्दल उदास असणे हा दुसरा भाग असतो. खेडोपाडी अनेक बुद्धिमान आणि कार्यकुशल स्त्रिया असतात. त्यांना समान वागणूक मिळाली, प्रोत्साहन मिळाले तर त्यांची झेप कितीतरी उंच जाऊ शकते.” रेश्मा सांबरेसारखी अनुभवी वकील आणि समाजसेविका आपल्या संस्थेबद्दल माझ्याशी बोलत होती. स्त्रियांच्या प्रगतीचा ध्यास घेऊन तिने ‘झेप’ ही संस्था २०१९ साली महाराष्ट्रात स्थापन केली आणि तिचे काम अव्याहत सुरू आहे. www.jhepfoundation.org या वेबसाईटवर ‘झेप’ संस्थेची अधिक माहिती मिळेलच. महाराष्ट्राच्या ग्रामीण व आदिवासी भागात काम करण्यासाठी रेश्मा अमेरिकेतून काही महिने भारतात येत असते.
स्त्रियांचे शिक्षण, त्यांच्या भोवतीचे वातावरण आणि त्यांची सक्षमता घडविण्याचे ध्येय घेऊन स्त्रियांना प्रगतीत मदत करणारी ‘झेप’ ही संस्था म्हणजे पब्लिक चॅरिटेबल संस्था आहे. रेश्मा या संस्थेची संस्थापक अध्यक्ष आहे. शिक्षणाने स्त्री कशी कणखर व डोळस बनू शकते याचे उदाहरण म्हणजे रेश्मा सांबरे स्वतःच आहे. अहमदनगर शहरात तिचे बालपण गेले. रूढी आणि परंपरांच्या नावाखाली स्त्रियांना दुय्यम वागणूक मिळत असते याची नोंद तिने लहानपणीच घेतली. स्त्रियांच्या शिक्षणालाही काही घरात विरोध असायचा. त्यांची मते विचारात घेतली जायची नाहीत. वंशाला दिवा हवा म्हणून त्यांची बाळंतपणे सुरू राहायची. स्त्रीने कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभे राहाणे आवश्यक आहे हे तिला जाणवले. रेश्माने ठरवले की, आपण स्वतःच शिक्षण घेऊन डोळस व्हायचे आणि अंधारातून बाहेर पडायचे.
शिष्यवृत्ती मिळवून तिने पुण्याच्या इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये (सी. ओ. इ. पी.) सिव्हिल इंजिनीयरिंगची डिग्री घेतली. त्यानंतर अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमधून बांधकाम व्यवस्थापन या विषयात एम. एस. केले. शिवाय वॉल्श कॉलेजमधून तिने फायनान्स घेऊन पुन्हा एम. एस. केले. अमेरिकेला राहायला गेल्यावर तिच्या लक्षात आले की, इथे काही स्त्रियांना कौटुंबिक छळाला सामोरे जावे लागत आहे. याला कोणता जात, धर्म, पंथ कारण नसतो, तर समाजाची मनोवृत्तीच कारण असते. भारतातून लग्न करून परदेशात आलेल्या काही स्त्रियांना घरातील पुरुषांकडून शिवीगाळ व मारहाण होते. त्यांचा छळ करणे, त्यांचा पासपोर्ट ताब्यात घेऊन त्यांची नाकेबंदी करणे, त्यांची पैशांची अडवणूक करणे, माहेरच्या लोकांशी संपर्क करू न देणे, अनैसर्गिक शारीरिक संबंध करण्यास भाग पाडणे असे प्रकार होतात. तेव्हा ती स्त्री खरंच असहाय्य होते. परक्या देशात तिचे कुणीही नातलग नसतात. कित्येकदा भाषेचा प्रश्न असतो, इज्जत आणि अब्रूचा प्रश्न असतो, यथास्थिती राखण्याचा प्रश्न असतो. मदतीसाठी कोणाकडे जायचे हा प्रश्न असतो.
अशा केसेस समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपणच पुढे व्हावे असे रेश्माला वाटले. पण अचूक सल्ला देण्यासाठी तेथील कायदा माहीत करून घेणे आवश्यक होते. तिने कायद्याचे शिक्षण घेण्याचे ठरविले. मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमधून तीन वर्षे अभ्यास करून ‘ ज्युरीज डॉक्टर (J. D.)’ ही पदवी प्राप्त केली. रेश्मा आता वकील म्हणून सल्ला देते. अनेक स्त्रियांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करते. अमेरिकेतील बऱ्याच कुटुंबात कौटुंबिक छळाला बळी पडलेल्या स्त्रियांचे आयुष्य सावरण्यासाठी मागच्या १५ वर्षांहूनही अधिक काळ ती कार्यरत आहे. अनेक स्त्रियांनी तिच्या कार्याबद्दल व्हीडिओ बनवून तिला धन्यवाद दिले आहेत. बी.एम.एम., मिशीगन एशियन इंडियन कॉम्युनिटी सर्विसतर्फेही अशा काही केसेस घेऊन समाजकार्य केले जाते. रेश्मासारखी निष्णांत वकील अशा केसेससाठी विनामोबदला काम करते.
परिस्थितीमुळे निराधार झालेल्या किंवा छळवणूक सहन करणाऱ्या स्त्रियांना आपल्यासाठी कुणी आहे हे कळविण्यासाठी रेश्मा सांबरे यांनी आपल्या समविचारी मैत्रिणींसह एक संस्था स्थापन केली. SAWA म्हणजे साऊथ एशियन विमेन्स असोसिएशन असे या संस्थेचे नाव आहे. (www.sawa-usa.org) सावाकडे येणारी एखादी केस समजून घेण्यासाठी केवळ कायद्याचे शिक्षण पुरेसे नव्हते. निरनिराळ्या तज्ज्ञ लोकांचा सल्ला यात घ्यावा लागतो. रेश्मा यांनी तिच्यासारख्याच निरनिराळ्या क्षेत्रातील कुशल स्त्रिया व काही पुरुष यांना सावाच्या कार्यकारिणीचे सदस्य केले. उदाहरणार्थ, तंत्रज्ञान प्रचारक, बालरोगतज्ज्ञ, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ, कायदा समुपदेशक, मनोविकारतज्ज्ञ, बतुल मीर – स्त्रीरोगतज्ज्ञ, south Asian social/cultural experts असे एकूण २१ बोर्ड डायरेक्टर्स सावासाठी काम करतात.
“बरं मग ही अमेरिकेतील सावा संस्था साऊथ एशियन स्त्रियांसाठीच काम का करीत आहे?” या माझ्या प्रश्नाला उत्तर देताना रेश्माने तेथील परिस्थिती सांगितली. मुस्लीम स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे धर्मगुरू वा दर्ग्याशी निगडित काही खास संस्था असतात. त्या बऱ्याचदा त्यांच्या समस्यांचा हल करतात. ख्रिश्चन लोकांकडेही चर्चमध्ये काही समस्या सोडविल्या जातात. आपल्या मंदिरांमध्ये मात्र काही सोयी सहसा नसतात. म्हणून साऊथ एशियन स्त्रियांना अशा प्रकारच्या मदतीची जास्त गरज पडते. बहुतांशी त्यांच्याच केसेस आमच्याकडे येतात. हे पाहून आम्ही त्यांच्यासाठी संस्था काढली. संस्थेची वेबसाईट आहे त्यावरून त्या आम्हाला संपर्क करू शकतात.”
केवळ कौटुंबिक हिंसाच नव्हे तर लैंगिक अत्याचार, लैंगिक स्वातंत्र्य, लिंगभाव असमानता अशा अनेक बाबतीत व्यक्तीला योग्य सल्ला आणि कणखर पाठिंबा देण्याची गरज असते. ‘सावा’ अशा व्यक्तींचा आधार बनते.