मुंबई: उज्जैनच्या(ujjain) महाकालेश्वर मंदिराच्या गेट नंबर ४ समोर मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहाहून अधिक जखमी झाले आहेत. जखमींमध्ये अनेकांची स्थिती नाजूक सांगितली जात आहे. त्यांना उज्जैन आणि इंदौरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
उज्जैन कलेक्टर आणि महाकालेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष नीरज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये एक महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. याशिवाय दोघांची स्थिती अतिशय गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्ह्ला प्रशासनाकडून उपचार सुरू आहेत.
उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या गेटनंबर ४ समोर जुनी भिंत होती. ही भिंत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून रंगरंगोटी करण्यात आली होती. या भिंतीच्या वरच्या भागात मध्य प्रदेश पर्यटन विकास निगमने एक लक्झरी हॉटेल बनवले आहे. या हॉटेलच्या गार्डनचे संपूर्ण पाणी या भिंतीच्या रस्त्याच्या खाली उतरत होते. शुक्रवारी उज्जैनमध्ये संध्याकाळी ४ वाजल्यापासून सातत्याने जोरदार पाऊस कोसळत होता. यामुळे संपूर्ण पाण्याने भिंतीवर दबाव बनला होता. यामुळे भिंत अतिशय नाजूक झाली होती.
ही भिंत त्या लोकांवर कोसळली जे महाकालेश्वर मंदिरात येणाऱ्या शिवभक्तांसाठी प्रसाद, फूल इत्यादींची विक्री करण्याचे काम करत होते. या दुर्घटनेत एक महिला आणि एका पुरुषाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे तर जखमींवर उपचार केले जात आहेत.