धुळे : खान्देशातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री रोहिदास चुडामण पाटील यांचे दीर्घ आजाराने आज, शुक्रवारी सकाळी निधन झाले आहे. ते ८४ वर्षांचे होते. मागच्या काही दिवसांपासून रोहिदास पाटील आजारी होते. त्यांच्यावर उद्या, शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. रोहिदास पाटील हे धुळे (ग्रामीण) आमदार कुणाल पाटील यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
कॉंग्रेसचे सच्चे कार्यकर्ते म्हणून पाटलांची ओळख होती, तसेच पाटलांचं संपूर्ण आयुष्य कॉंग्रेसमध्ये गेलं. रोहिदास पाटलांनी काँग्रेसच्या काळात विविध खात्याचे पद भूषवले होते. धुळे जिल्ह्याला वरदान ठरणारे अक्कलपाडा धरण बांधण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता. शनिवारी सकाळी ११ वाजता नेहरू हौसिंग सोसायटी येथील निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. तर एसएसव्हीपीएस महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांचा अंत्यविधी होणार आहे.
राजकीय कारकीर्द
रोहिदास पाटील यांना राजकीय वारसा घरातूनच लाभला. वडील चुडामण पाटील हे धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. १९६२, १९६७ आणि १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत चुडामण पाटील यांनी विजय मिळविला होता. हा वारसा रोहिदास पाटील यांनी पुढे चालवला. जवाहरच्या माध्यमातून त्यांनी काँग्रेसची जहागिरी कायम ठेवली. जुन्या कुसुंबा विधानसभा मतदारसंघातून ते १९८५ हा एक अपवाद वगळता १९७८ ते २००९ पर्यंत आमदार होते.
या दरम्यान, त्यांनी राज्याचे कृषीमंत्रीपदाची जबाबदारी अत्यंत उत्तमरित्या सांभाळली होती. २००९ मध्ये मात्र पाटील यांना पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर २०१४ मध्ये कुणाल पाटील यांनी मोदी लाटेतही तब्बल ४६ हजार मतांनी विजय मिळवत वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला. २०१९ मध्येही कुणाल पाटील यांनी दुसऱ्यांदा विजय मिळविला.