पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे काल पुणे (Pune) दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते पुण्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण होणार होते. मात्र पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाला. त्यामुळे पुणे मेट्रो लोकार्पणाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला. परंतु आता या भुयारी मार्ग उद्घाटनाचा नवा मुहूर्त समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या रविवारी म्हणजेच २९ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरंन्सद्वारे मेट्रोला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर मेट्रोची जिल्हा न्यायालय ते स्वारगेट ही भुयारी मार्गाची सेवा पुणेकरांसाठी उपलब्ध होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मेट्रो स्थानकासोबतच स्वारगेट – कात्रज या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील करणार आहेत. तसेच क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले स्मारक भिडे वाडा येथे पहिल्या मुलींच्या शाळेचं भूमिपूजन देखील करणार आहेत. तर बिडकीन औद्योगिक क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर लोकार्पण आणि सोलापूर विमानतळाचे उद्घाटन देखील मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.