दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर एप्रिल-मे महिन्यात मुंबई महापालिका नालेसफाई केल्याचा दावा करते. पावसाळ्यासाठी प्रशासन सिद्ध असल्याचे सांगते. यंदा कुठेही आता पावसाचे पाणी तुंबणार नाही, असे ठामपणे सांगते. रेल्वे प्रशानसही रुळांवर पाणी साचू नये म्हणून यंदा दक्षता घेतल्याचे सांगते. प्रत्यक्षात मुसळधार पाऊस झाला की, महापालिका व रेल्वे प्रशासनाचे दावे कसे फोल ठरतात, याचा अनुभव यंदाच्या वर्षी दोन वेळा पावसाळ्यात मुंबईकरांना अनुभवयाला मिळाला.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे बुद्धिमान व्यक्तिमत्व आहे. कुशल प्रशासक आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याकडे नेहमीच महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत येऊन लोकलने प्रवासाचाही अनुभव घेतला. मग मुसळधार पाऊस झाला की, रेल्वे रुळांवर पाणी साचते व उपनगरी सेवा ठप्प होते, हे कधी थांबायला नको का? मुंबई महापालिकेवर आता भूषण गगराणी यांच्यासारखे तडफदार व कार्यक्षम अधिकारी आयुक्त म्हणून आहेत. तरीही पावसात रस्ते पाण्याखाली का जातात, वाहतुकीची सर्वत्र कोंडी का होते, रस्त्यावरील अतिक्रमणे व फेरीवाल्यांचा बंदोवस्त का होत नाही? या सर्वांचा परिणाम सर्वसामान्य मुंबईकर जनतेला वारंवार भोगावा लागतो. या महानगरात आपल्याला कोणी वाली नाही का, असा प्रश्न मुंबईकरांना पडतो. रेल्वे आणि बेस्ट सेवा उत्तम व स्वच्छ मिळाली, तर सर्व काही सुरळीत होऊ शकते. पण मुंबई शहरातील रस्ते व रेल्वे मार्ग दरवर्षी पावसाळ्यात पाण्याखाली जातात, हे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला मुळीच शोभादायक नाही. जोरदार पाऊस झाला आणि समुद्राला भरती असली की मुंबईत पाणी साचते, असे ठोकळेबाज उत्तर वर्षानुवर्षे नोकरशहांकडून ऐकायला मिळते.
विज्ञान-तंत्रज्ञान आता इतके पुढे गेले आहे की, मुंबईची तुंबई होऊ नये, यासाठी काहीच उपाय नाही का? यंदाच्या मान्सूनचा परतीचा पाऊस फटका देणार याचा अंदाज आला होता. बाप्पाच्या कृपेने पावसाने गणेशोत्सवात राज्यात कुठेही विघ्न आले नाही. पण विसर्जन झाल्यानंतर राज्याच्या वेगवेगळ्या भागात वरूणराजाने आपला इंगा दखवायला सुरुवात केली. पाऊस कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले, म्हणून पावसाला दोष देता येणार नाही. प्रशासनाने आपली कामे किती काटेकोर व दर्जेदार केली त्यावर जनजीवन अवलंबून असते. परतीच्या पावसाने धिंगाणा घातला म्हणून मुंबईची तुंबई झाली असे सांगणे म्हणजे आपल्या अपयशावर पांघरूण घालण्यासारखे आहे. प्रशासन तोकडे पडले, प्रशासनाने कामे व्यवस्थित केली नाहीत म्हणून बस व रेल्वे सेवा विस्कळीत झाल्याचा अनुभव मुंबईकरांना आला. बुधवारी दुपारनंतर कोसळलेल्या पावसाने मुंबईत कुर्ला, चेंबूर, शीव, कांजूर, विक्रोळी, भांडुप, हिंदमाता, परळ, अंधेरी, मालाड, दहिसर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. सहा तासांत अडीचशे ते तीनशे मिमी पाऊस कोसळल्याचे सांगण्यात आले. अनेक ठिकाणी रस्त्यावर दोन ते तीन-चार फूट पाणी होते. रात्री कित्येक तास रस्ते, पदपथ, सब-वे पाण्याखाली होते. मध्य रेल्वेच्या उपनगरी प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने ऐन गर्दीच्या वेळी उपनगरी रेल्वे सेवा बंद झाली.
सीएसटीपासून प्रत्येक रेल्वे स्थानकाबाहेर हजारो लोक रस्त्यावर दिसले. पण रोज लोकलने प्रवास करणाऱ्या लक्षावधी मुंबईकरांना टॅक्सी, रिक्षा मिळणार तरी कोठून? बेस्टच्या शेकडो बसेस रस्त्यावर साचलेल्या पाण्यात रांगने उभ्या असलेल्या दिसल्या. प्रवाशांसाठी बसेस पाण्यातून आणणार तरी कोठून? लक्षावधी मुंबईकर लोकल्स सेवा सुरू झाल्यावर रात्री दोन-अडीच वाजता घरी पोहोचले.
कल्याण, डोंबिवली, अंबनाथ, बदलापूरला राहणाऱ्या चाकरमान्यांचे तर मोठे हाल झाले. मुंबई महानगरात सर्वत्र नाक्यानाक्यांवर राजकीय पुढाऱ्यांच्या छब्या चमकवणारे फलक झळकत असतात. मग या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मुंबई विस्कळीत झाली तेव्हा कुठे होते? रस्त्यावर हजारो मुंबईकर त्यातही महिलांची संख्या लक्षणीय होती, बस, टॅक्सीची वाट पाहत होते, तेव्हा त्यांच्या मदतीला कोणीही कार्यकर्ते म्हणविणारे किंवा होर्डिंगवरचे भाई-दादा-भाऊ मदतीला आल्याचे कुठे दिसत नाही. चार तासांनी लोकल्स सुरू झाल्या तेव्हा मुंबईकरांना हायसे वाटले. तुंबलेल्या पाण्यातून बेस्टच्या बसेस मार्ग काढताना दिसल्या तेव्हाही बेस्टचे कौतुक वाटले. प्रशासनही रस्त्यावर कुठे दिसले नाही. रस्ते अनेक ठिकाणी खोदलेले आहेत. मेट्रो, रस्ते, पुलाची कामे चालू आहेत, पावसाने खड्डे तर आहेतच, तरीही भर पावसात हातात छत्र्या घेऊन तोल संभाळत हजारो मुंबईकर पाण्यातून चालताना दिसत होते. मुंबईसाठी हजारो कोटींच्या विकास प्रकल्पांची घोषणा करणाऱ्या राज्यकर्त्यांनी मुंबईकरांवर ही पाळी वारंवार का येते, याचा गंभीरपणे कधी विचार करायला नको का?