मुंबई: दही प्रोटीन आणि कॅल्शियमचा चांगला स्त्रोत आहे. यामुळे डाएटमध्ये दह्याचा नियमितपणे समावेश करावा. दह्यामध्ये आपल्या पोटासाठी फायदेशीर असलेले बॅक्टेरिया असतात जे खाल्ल्याने आपले आरोग्य चांगले आणि इम्युनिटी मजबूत राहते.
दह्यामध्ये काही लोक साखर तर काहीजण मीठ घालून खातात. जर तुम्ही दह्यात मीठ टाकून खात असाल तर तुम्ही हे ही जाणून घेणे गरजेचे आहे की असे केल्याने तुमच्या आरोग्याला नुकसान होऊ शकते.
आयुर्वेदानुसार दह्यामध्ये कधीही मीठ घालून खाऊ नये. तुम्ही दह्यामध्ये साखर, गूळ अथवा कोणतीही गोड गोष्ट मिसळू शकता मात्र मीठ घालून खाल्ल्याने त्याचे शरीरास फायदे होत नाहीत.
दह्यामध्ये जर तुम्ही अधिक मीठ टाकून खात असाल तर त्याचा परिणाम तुमच्या मेटाबॉलिज्मवर होऊ शकतो. यामुळे दह्यात मीठ घालून खाऊ नये. दह्यामध्ये पोटासाठी फायदेशीर असे लॅक्टोबेसिलस बॅक्टेरिया असतात ज्यामुळे आपल्या शरीराला फायदा होतो.
आयुर्वेदानुसार जर आपण दह्यामध्ये मीठ टाकतो तर हे बॅक्टेरिया मरून जातात. त्यामुळे शरीराला फायदे होण्याऐवजी नुकसानच होते. मात्र जर तुम्हाला दही साखरेशिवाय मीठ टाकून खायचे असेल तर साधे अथवा काळे मीठ टाकण्याऐवजी सैंधव मीठ घाला.
आयुर्वेदात हे ही सांगितले आहे की दही नुसतेच खाऊ नये तर दह्यामध्ये साखर, मध अथवा गूळ मिसळून खावे. सोबतच रात्रीच्या वेळेस दही खाऊ नये. दह्यामधील गोडवा आणि आंबटपणा यामुळे त्यात म्युकस निर्माण होऊ शकतात यामुळे श्वासासंबंधी त्रास अथवा आर्थरायटिसचा त्रास होऊ शकतो.