मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तही मुंबईत आले असून कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांच्या तारखेची घोषणा होऊ शकते. भाजपानेही निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असून विदर्भ, मराठवाड्यानंतर आता भाजपाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याने आता मिशन मुंबई ठरवत खास प्लानिंग केले आहे. लोकसभा निवडणूकीत महायुतीला मुंबईत अवघ्या दोन जागांवर विजय मिळाला तर चार जागांवर पराभवाचा सामना करावा लागला होता. येत्या १ किंवा २ ऑक्टोबरला अमित शहा हे मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांनी विधानसभेसाठी खास रणनिती आखली आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपाला निर्भेळ यश मिळाले नाही. त्या निवडणुकीत दणका बसल्यानंतर आता भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मात्र कंबर कसली असून अमित शहा वारंवार महाराष्ट्रात येताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने विदर्भ,मराठवाड्यासाठी खास रणनिती आखली. त्याचप्रमाणे आता मुंबईसाठीही स्पेशल मिशन असून मुंबईसाठी अमित शहांनी खास प्लानिंग केले आहे. मुंबईतील जे ‘धोकादायक’ मतदारसंघ आहेत, त्याचा विभागनिहाय आढावा अमित शहा घेणार आहेत. एवढेच नव्हे तर ते मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांशी स्वत: संवाद साधणार आहेत.
मुंबई भाजपा अलर्ट मोडवर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यामुळे मुंबई भाजपा अलर्ट मोडवर गेला आहे. पुढच्या तीन दिवसांमध्ये मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचे आदेश भाजपा पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या तीन दिवसांमध्ये मुंबईच्या प्रत्येक विधासभा मतदारसंघाचा एक अहवाल तयार केला जाणार असून तो अमित शहा यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. या अहवालानुसार, ज्यांची कामगिरी समाधानकारक नसेल त्यांचे टेन्शन वाढणार असून,त्यांच्याबद्दल अमित शहा काय भूमिका घेतात, त्यांना काय कानपिचक्या देतात याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात विरोधकांची मुळे कमकुवत करा
महाराष्ट्रात भाजपाचे पूर्ण बहुमत आणायचे असेल तर विरोधकांची मुळेच कमकुवत करा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बुथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांना भाजपाशी जोडा, असे आदेशही अमित शहा यांनी कोल्हापूरच्या दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना दिले. प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. त्याला आपल्याशी जोडून त्याच्या कौशल्याचा उपयोग करून घ्या, असे अमित शहा म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याने कार्यकर्ते थोडे उदास झाले होते, पण आता आळस झटकून कामाला लागा. निवडणुकीत जोमाने काम करा. आपली सत्ता कशी येईल याचा विचार करा, असा सल्लाही शहा यांनी कोल्हापुरात दिला होता.
लवकरच वाजणार विधानसभा निवडणुकीचे बिगूल
महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन झाले असून निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे.