Monday, October 7, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यजागरूकता पाळा-पैसे सांभाळा...!

जागरूकता पाळा-पैसे सांभाळा…!

आपल्याला सध्याच्या काळात बरेचदा ऑनलाईन आर्थिक व्यवहार करावे लागतात. अनेक मेसेज, मेल आपल्याला येत असतात. त्यात काही फसवणूक करणारे असू शकतात. काल असाच एक ईमेल आला आणि त्याला ई-FD जोडलेली होती. अगदी खरा वाटणारा हा मेल होता. सावधगिरी म्हणून मेल ओपन न करता बँकेत चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितले की, असा कुठलाही मेल आम्ही पाठवलेला नाही. त्याच आनुषंगाने सांगावेसे वाटते की, कधी बेसावधपणे आपण असा फसवा मेसेज किंवा मेल बघितला, ओपन केला आणि अकाउंटमधून क्षणार्धात पैसे गेले तरी घाबरून न जाता लगेच १९३० ह्या नंबरवर फोन केला पाहिजे. तसेच www.cybercrime.gov.in ह्या संकेत स्थळावर जाऊन तक्रार नोंदवावी.

ग्राहक पंचायत – रेखा केळकर

फसवणूक बहुतेक वेळा अनोळखी, बिन चेहऱ्याच्या माणसांकडून किंवा काही वेळा एखाद्या ओळखीच्या, भरवशाच्या माणसाकडूनही होऊ शकते. श्री. व सौ. गंगोपाध्याय हे हैदराबाद येथे राहणारे ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सेव्हिंग आणि मुदत ठेव खाते होते. ९ ऑगस्ट २०१७ रोजी सौ. गंगोपाध्याय ह्यांनी १५ लाखांच्या २ आणि १० लाखांची १ अशा ४० लाखांच्या मुदत ठेवी SBI हैदराबाद शाखेत उघडल्या. श्री. गंगोपाध्याय ह्यांनी जवळ जवळ २ वर्षांनी, ४ एप्रिल २०१९ ला बँकेकडून नोव्हेंबर २०१८ ते मार्च २०१९ चे अकाउंट स्टेटमेंट घेतले. ते वाचून त्यांना जबरदस्त धक्का बसला कारण अकाउंटमध्ये २८ लाखांऐवजी ३ लाख रुपयेच शिल्लक होते. त्यांना असेही आढळले की हे पैसे इंटरनेट बँकिंगमार्फत वळवले गेले होते. पण आश्चर्य म्हणजे त्यांनी इंटरनेट सेवा मागितली नव्हती. त्यांनी VIEW ONLY सेवा मागितली होती. मग हे कसे घडले असेल बरे ह्या विचारात ते पडले. नंतर लक्षात आले की, एका ओळखीच्या, विश्वासातल्या माणसाकडून त्यांची मोठी फसवणूक झाली होती. त्यांनी ५ दिवसांनी पोलिसात तक्रार केली आणि लगेच बँकेच्या शाखेत तक्रार केली. त्यांनी बँकेच्या असे निदर्शनात आणून दिले की ४० लाखांच्या ठेवी मुदत संपण्या अगोदर बंद करून सेव्हिंग खात्यात पैसे जमा केले गेले आणि या पैशातील फक्त ३ लाख रुपये शिल्लक राहिले आहेत. ह्यावर बँकेने असे सांगितले की, सौ. गंगोपाध्याय ह्यांच्या अकाऊंटची इंटरनेट बँकिंग सेवा अनधितकृतपणे वापरली गेली असण्याची शक्यता दिसते. इथे असे नमूद करावेसे वाटते की त्यांचे बँकेचे सर्व व्यवहार त्यांचा ड्रायव्हर करीत असे.

बँकेने काहीच मदत न केल्याने गंगोपाध्याय ह्यांनी राज्य आयोगाकडे तक्रार केली. नुकसानभरपाई म्हणून ६३ लाख, वार्षिक व्याज, मानसिक त्रासाबद्दल २५ लाख आणि कोर्टकचेरीच्या खर्चाबद्दल २० हजार रुपये मागितले. तक्रारीत त्यांनी ह्या गोष्टीवर भर दिला की खातेदार ज्येष्ठ नागरिक आहेत आणि TECH SAVVY नाहीत म्हणून सावधगिरीचा उपाय म्हणून त्यांनी view only पर्याय निवडला होता. बँकेने निष्काळजीपणे खातेदाराकडे चौकशी न करता view only पर्याय बदलून पैशाचे व्यवहार करण्याची परवानगी दिली. त्यामुळे ह्या नुकसानाला बँकच जबाबदार आहे. ह्यावर बँकेने सांगितले की खातेदाराने आपला मोबाईल, PIN नंबर, पासवर्ड आणि इतर माहिती ड्रायव्हरसारख्या जवळच्या माणसाला देणे हे चुकीचेच आहे. बँकेने पुढे असेही म्हटले की, हे सर्व ३७ वेळा केले गेलेले व्यवहार एकतर खातेदाराच्या संमतीने झालेले आहेत किंवा खातेदाराच्या निष्काळजीपणामुळे झालेले आहेत.

दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून राज्य आयोगाने गंगोपाध्याय ह्यांच्या बाजूने निर्णय दिला. आयोगाने स्टेट बँकेला असेही सांगितले की, ते ६३ लाखांच्या वसुलीसाठी ते फौजदारी न्यायालयात दावा दाखल करू शकतात. ह्यावर स्टेट बँकेने राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे वरील निर्णयाविरुद्ध अपील केले. त्यांनी असा युक्तिवाद केला की फसवणुकीच्या तक्रारी ह्या ग्राहक आयोगाकडे न करता दिवाणी न्यायालयात करायला हव्या होत्या. सायबर क्राइम आणि बँकिंग लोकपाल ह्यांनी गंगोपाध्याय ह्यांची तक्रार फेटाळून लावली होती याकडेही लक्ष वेधले. दुसरे असे की RBI च्या परिपत्रकानुसार ग्राहकाच्या निष्काळजीपणामुळे गेलेले पैसे वसूल करण्याची जबाबदारी बँकेची नाही. ह्यावर गंगोपाध्याय ह्यांच्या वकिलाने असे प्रतिपादन केलं की ह्या घटनेनंतर बँकेने इंटरनेट बँकिंगच्या प्रणालीत सुधारणा केली. फोनवरून कुठलाही बदल न करता खातेदाराने बँकेत प्रत्यक्ष येणे बंधनकारक केलं. ह्यावरून हे सिद्ध होते की, बँकेच्या प्रणालीत त्रुटी होत्या. हे सगळे ऐकून घेतल्यावर राष्ट्रीय आयोगाने असे म्हट्ले की, प्रणालीतल्या त्रुटींमुळेच त्यांचा ड्रायव्हर केवळ मोबाईल नंबर आणि अकाउंट नंबर एव्हढ्याच माहितीच्या आधारे ‘VIEW ONLY’ पर्याया वरून पैसे काढण्याच्या परवानगी वर बदल करू शकला. सर्व गोष्टींचा विचार करून राष्ट्रीय आयोगाने स्टेट बँकेचे अपील फेटाळून लावले आणि राज्य आयोगाचा निर्णय कायम ठेवून गंगोपाध्याय ह्यांना नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला.

वरील केसमध्ये खातेदाराला नुकसानभरपाई मिळाली असा निर्णय झाला असला तरीही ग्राहक म्हणून आपण बँकेचे व्यवहार शक्यतो स्वतःच करावे, वेळोवेळी पासबुक अपडेट करावे, इंटरनेट बँकिंग सेवा घेतली असेल, तर अनोळखी फोन घेऊ नये, कुठलीही अनोळखी लिंक उघडू नये, ती असुरक्षित, फसवी असू शकते. आपला PIN/ CVV/ PASSWORD/ OTP कोणालाही सांगू नये. खूप जास्त व्याज किंवा फायदा देऊ असे दाखविणाऱ्या भूलपाडू जाहिरातींना बळी पडू नये. एकच संदेश लक्षात ठेवावा ‘जागरूकता पाळा-पैसे सांभाळा’.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -