विशिष्ट राजकीय पक्षांसाठी सरोदे यांचे सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हीझम
शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांची घणाघाती टीका
मुंबई : बदलापूरसारख्या संवेदनशील प्रकरणी पोलिसांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील असीम सरोदे उबाठाचे निकटवर्तीय असून ते सिलेक्टिव्ह ऍक्टिव्हीझम करत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी आज केली. चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या नराधम अक्षय शिंदेचा वकील सरोदे यांना एवढा पुळका का आला, असा सवाल डॉ. कायंदे यांनी यावेळी केला. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या की, सरोदे पेशाने वकील आहेत. त्यांना याचिका दाखल करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र त्यांनी पोलिसांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आमचा तीव्र आक्षेप आहे. त्यामुळे वकील असीम सरोदे एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा चालवत आहेत का, अशी शंका डॉ. कायंदे यांनी व्यक्त केली.
सरोदे उबाठाच्या सांगण्यावरुन याचिका दाखल करतात
मागील काही महिन्यांचा घटनाक्रम बघितला तर असीम सरोदे ठराविक राजकीय पक्षांना फायदा होईल, अशीच भूमिका घेत आहेत. उद्धव ठाकरेंशी सरोदे यांची भेट, ठाकरे कुटुंब आणि असीम सरोदे यांच्या भेटीचे फोटो सोशल मिडियावर आहेत. हेच वकील असीम सरोदे हे काही महिन्यांपूर्वी उबाठाच्या मंचावर बोलताना दिसले होते. सरोदे आणि ठाकरे यांच्या भेटीगाठींवरुन सरोदे उबाठाच्या सांगण्यावरुन याचिका दाखल करतात का असा खरमरीत सवाल डॉ. कायंदे यांनी विचारला.
पोलिसांबाबत घेतलेल्या भूमिकेवर संशय
बदलापूर प्रकरण घडलं तेव्हा उत्स्फूर्तपणे जनआंदोलन झाले होते. तेव्हा विरोधकांनी आरोपीला ताबडतोब फाशी द्या, अशी मागणी केली होती. याबाबत खटला सुरु होता. मात्र रिमांडमध्ये असताना आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला आणि स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत वकील असीम सरोदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कोर्टात जाण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे मात्र वकील सरोदे यांचा पोलिसांबाबत घेतलेल्या भूमिकेवर संशय निर्माण होतो, असे डॉ. कायंदे म्हणाल्या.
कोविड काळात मुंबईत कोविड सेंटर घोटाळा, बॉडीबॅग घोटाळा, खिचडी घोटाळा असे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले त्याबाबत सरोदे न्यायालयात का गेले नाहीत. महाविकास आघाडीच्या काळात मनसुख हिरेन यांची हत्या झाली होती, त्याविषयी सरोदेंनी न्यायालयात धाव का घेतली नाही, असा सवाल त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या काळात निर्भय बनो आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सरोदे यांनी आरोपांची राळ उठवली होती. माननीय राज्यपाल यांच्या विरोधातही सरोदे यांनी जाहीर अपशब्द काढले होते. संसदेमध्ये अश्रुधुराच्या नळकांड्या फोडणाऱ्या आरोपीचे वकीलपत्र सरोदे यांनी घेतले, असेही डॉ. कायंदे म्हणाल्या.