एका अज्ञात महिलेने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयामधील कार्यालयाची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे सगळीकडेच एकच खळबळ उडाली आहे. (Devendra Fadnavis ) प्राथमिक माहितीप्रमाणे, पास न काढता संबंधित महिला मंत्रालयात शिरली. सचिवांसाठी आत जाण्यास असलेल्या गेटने महिलेने मंत्रालयात प्रवेश केला. फडणवीस यांच्या कार्यालयाची या महिलेने तोडफोड केली. त्यानंतर ही महिला तिथून निघून गेली आहे. आता या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या महिलेचा शोध सुरु केला आहे.
मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी ही घटना घडल्यामुळे समोर आल्या आहेत. गुरुवारी रात्री ही महिला मंत्रालयात शिरली. मंत्रालयाच्या परिसरात त्यावेळी फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळेच ही महिला सचिवांच्या गेटने सहजपणे कोणाच्याही लक्षात न येता आतमध्ये शिरली. त्यानंतर ही महिला फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर गेली आणि त्याठिकाणी तोडफोड केली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
कसा मिळाला प्रवेश ?
कार्यालयाबाहेर या महिलेने देवेंद्र फडणवीस यांची नेमप्लेट काढून फेकून दिली आणि यानंतर घोषणाबाजीही केली. नक्की ही महिला काय म्हणत होती, हे अद्याप समजू शकलेले नाही. ही महिला नक्की कोण होती, ती पास नसून आतमध्ये कशी जाऊ शकली, या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाही. मरिनड्राईव्हच्या पोलिसांनी सध्या या घटनेचा तपास सुरु केला आहे. त्यामुळे आता तपासातून काय निष्पन्न होणार, हे पाहावं लागणार आहे.