पाटणा: बिहारमध्ये जिवितपुत्रिका उत्सव साजरा केला जात असताना विविध जिल्ह्यांमध्ये घडलेल्या दुर्घटनेत एकूण ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. या सणादरम्यान स्नान करत असताना या ४३ जणांचा मृत्यू झाला. तर तीन जण अद्याप बेपत्ता आहेत. राज्य सरकारने गुरूवारी ही माहिती दिली.
बुधवारी हा उत्सव होता. या उत्सवादरम्यान १५ विविध जिल्ह्यांमध्ये या दुर्घटना घडल्या. जीवितपुत्रिका उत्सवादरम्यान महिला आपल्या मुलांच्या दीर्घायु तसेच निरोगी आरोग्यासाठी निर्जला उपवास करतात. तसेच पवित्र स्नान करतात. बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील पूर्वांचल भागात हा सण प्रामुख्याने साजरा केला जातो.
चार-चार लाख रूपयांचा मदतनिधी
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना प्रत्येकी चार लाख रूपये मदतीची घोषणा केली आहे. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या विधानात म्हटले की अनुग्रह राशी देण्याची प्रक्रिया सुरू झाला आहे. आठ मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना ही रक्कम आधीच मिळाली आहे.
या जिल्ह्लयांमध्ये घडल्या घटना
रिपोर्टनुसार पूर्व आणि पश्चिम चंपारण, नालंदा, औरंगाबाद, कॅमूर, सीवान, रोहतास, सारण, पाटणा, वैशाली, मुझ्झफरपूर, समस्तीपूर, गोपाळगंज आणि अरवल जिल्ह्यांमध्ये या सणादरम्यान या दुर्घटना घडल्या.