केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा राहूल गांधींवर घणाघात
उधमपूर : मोदी सरकारमध्ये दगडफेक किंवा दहशतवादाच्या घटना घडत नाही. राहुल बाबा म्हणतात आम्ही ३७० परत आणू. पण, तुमच्या पुढील तीन पिढ्यांमध्ये ३७० परत आणण्याची ताकद नाही, असा घणाघात अमित शहा यांनी राहूल गांधींवर केला.
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोचला आहे. भाजप आणि काँग्रेसचे दिग्गज नेते सक्रीयपणे राज्यातील विविध मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी उधमपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला.
ते पुढे म्हणाले की, राहुलबाबा काल म्हणाले की, आम्ही राज्याचा पूर्ण दर्जा देऊ. जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा नक्कीच मिळेल, पण तो नरेंद्र मोदी देतील. ओमर अब्दुल्ला आणि राहुल बाबा म्हणतात की, आम्ही काश्मीरमध्ये लोकशाही आणू. पण, याच कुटुंबांनी जम्मू-काश्मीरला ७० वर्षे याच दोन कुटुंबांनी विभागून ठेवले. यापूर्वी राज्यात शांततेत निवडणुका व्हायच्या का? नरेंद्र मोदींमुळे आज राज्यात शांततेत निवडणुका होत आहेत. काँग्रेस आणि एनसीला जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवाद आणायचा आहे. हे लोक आपल्या देशाच्या संसदेवर हल्ला करणाऱ्या अफझल गुरूच्या फाशीच्या शिक्षेचा निषेध करतात. ओमर अब्दुल्ला दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालायचे. अफल गुरुला फाशी देणे गरजेचे होते. जो कोणी दहशत पसरवेल त्याला फाशीनेच उत्तर दिले जाईल. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद परत आणण्याची ताकद कोणामध्ये नाही, असे शहा यावेळी म्हणाले.