ऋतुराज – ऋतुजा केळकर
“मन रामरंगी रंगले…
चित्तरंगी रंगले…
मन रूपरंगी रंगले…
रामरंगी रंगले …”
किती सुरेख शब्द आहेत हे. मनाच्या चित्तशुद्धीकरिता रामनामाची असलेली महती यथार्थपणे या चार ओळींमध्ये सहजगत्या सामावलेली आहे असे नाही का वाटत? ‘मन’ म्हणजे तरी काय हो? ‘मन’ म्हणजे ‘आभाळ’, की जे मळभाने झाकोळलेले आहे, क्रोध, मद, मत्सर या आणि यासारख्या रिपूंनी. या रिपूंनी मळलेल्या, झाकोळलेल्या आभाळातून मनःशांतीच्या सूर्याची किरणे कधीच डोकावत नाहीत. पण तरीही या सूर्याचा कधीच अस्त होऊ शकत नाही. याला संपूर्णपणे झाकोळण्याची ताकद ही त्यांच्यात अजिबातच नव्हती आणि नाही. कारण अंतःकरण कितीही विषयवासनांनी मळलेले असले तरीही ईश्वरी ‘आत्मसाक्षात्काराने आता उरलो उपकारापुरता;’ म्हणून मनातील सृजनत्त्वाच्या वृक्षाची छाटणी कधीच होत नाही.
जसा काळा कुळकुळीत कोळसा हा अग्नीच्या सान्निध्यात आल्यानंतर त्याचे रूपांतर रखरखीत निखाऱ्यात होते. तसेच नामाच्या अग्नीत आपल्या विषयासक्त मनाचे पुर्णपणे परिवर्तन होते. मनातील कोळसा होऊन दडलेल्या संस्कारांचे रुपांतर सुरूवातीला ठिणगीत आणि मग ज्योतीत आणि पुन्हा पुढे वणव्यात रूपांतरीत करण्याची ताकद कुठल्याही नामात आहे.
सध्याच्या विज्ञान युगाच्या भाषेत समजावून सांगायचे झाले तर, ‘ए आय’ या संकल्पनेनुसार आपल्या मनात आलेल्या विचारानुसार आपल्या मोबाइलवर सर्व गोष्टी दृश्यमान होऊ लागतात. तसेच नामाचेही आहे. सर्वप्रथम नामामुळे उच्चार शुद्ध होतात. त्याचबरोबर एकाग्रतेने वाढ होते आणि सरतेशेवटी आपण जे विचार नामस्मरणाद्वारे ब्रम्हांडाकडे फेकतो ते दुप्पट चौपटीने आपल्याकडे परत येतात आणि आपल्या इच्छा आकांक्षा पुर्ण होतात.
म्हणूनच व्यवहाराच्या सीमा रेषेतून पुढे जाऊन अणू-परमाणूत दडलेल्या त्या ॐकार स्वरूप जगद्जेत्याचे अधिष्ठान आपल्या मनात नामस्मरणाच्या द्वारे एकदाका केले की मग ज्याप्रमाणे दागिन्यांवरील मळ हा सोनार काढून टाकतो. त्याचप्रमाणे या विषयविकारांची पुटे देखील नाहिशी होतात. मग या मनाच्या स्वच्छतेमुळे सद् विवेकी व्यक्तींच्या सुविचारांच्या गंगा त्यांच्या वर्तणुकीत ही वळणावळणावर दिसून आल्याखेरीज राहत नाहीत.
नामामुळे जीवनातील काटे दूर होतातच शिवाय नामाच्या चंदनाच्या शितलतेमुळे नात्यातील कटुता देखील दूर होते. आकाशाची विशालता आणि सागराची गंभीरता आचरणात आल्याने आपोआपच मनात कारुण्याचा तसेच क्षमेचा सागर उचंबळून येतो. माणसाच्या अंगात फक्त धैर्य, शौर्य आणि निर्णयक्षमता असून चालत नाही तर जीवनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी या सत्त्वसुंदर विचारांच्या पारिजातची फुलबाग ही मनाच्या गाभाऱ्यात सदैव झुलत राहायला हवी.
कसे आहेना की, ‘अवघाची संसार सुखाचा करीन’ या ज्ञानेश्वरांच्या ओवीचे आपल्या जीवनात जर प्रत्यक्षात अवतरण व्हावे असे वाटत असेल तर, मोहाच्या इच्छांच्या कोंबांना मनात रोवणी-पेरणी करूच देऊ नका. नामाच्या रूईने… स्नेहाच्या नेकीच्या तेलवातीने… स्वयंभू आत्म्याच्या दिव्याला तेजस्वी करण्याचा यत्न करून ऋतूभारणीच्या वाटेवर स्मरणशिल्पांच्या पोथ्यांमध्येही विस्मरणाचे, क्षमेचे, भावभावनांच्या संगोपनाचे बिजमंत्र कोरून ठेवा. जेणेकरून मानवी देहाच्या रंध्रारंध्रात दैवी सुत्रांची माला आपल्या विश्वार्त उद्यानमंत्रांनी जगातील दुर्योधन – दुःशासन यांना इतके हतबल होतील की, आपल्या मृत्यूच्या अटळतेचे दुःख आपल्यापेक्षा त्यांनाच हे इतके हतबल होईल की, बेलगाम बांडगुळं तुम्हा बिनशर्त शरण येतील आणि माझ्याच शब्दांत सांगायचे झाले तर, तुमची बदनामी करणारी हीच माणसे म्हणतील…
‘तुझ्याकरिता लिहिता लिहिता…
मी लेखणी झाले…
कसं सांगू सख्या…
मी कधी तुझी झाले…’
मी कधी तुझी झाले…