Saturday, April 26, 2025
Homeताज्या घडामोडीवरुणराजाची अवकृपा,अनेक जिल्ह्यात खरीप पिके धोक्यात

वरुणराजाची अवकृपा,अनेक जिल्ह्यात खरीप पिके धोक्यात

दीपक मोहिते

मुंबई: गेल्या तीन दिवसांपासून राज्यात होत असलेल्या मुसळधार वृष्टीमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.मुंबई,ठाणे,पालघर, रायगड,सोलापूर,नाशिक व इतर अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. या अस्मानी संकटामुळे राज्यातील खरीप हंगामातील पीके धोक्यात आली आहेत.दरम्यान हवामान विभागाने सलग तीन दिवस अतिवृष्टी होईल,असा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

मुंबई व ठाणे सारख्या महानगरात सर्वत्र पाणी साचून राहिल्यामुळे कालपासून दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.अनेक भागात रेल्वेरुळावरून पाणी वाहत आहे.त्यामुळे उपनगरीय सेवा देखील विस्कळीत झाली आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाने शैक्षणिक संस्था ( शाळा व महाविद्यालये ) बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी परतीच्या पावसाचा दगाफटका होण्याची शक्यता वर्तवली होती,ती तंतोतंत खरी ठरली आहे. पालघर जिल्ह्यात वाडा,विक्रमगड,जव्हार, मोखाडा,तलासरी व डहाणू तालुक्यात भातशेतीचे क्षेत्र मोठ्याप्रमाणावर आहे.

सध्या कापणीची कामे सुरू असतानाच हे संकट कोसळल्यामुळे शेतकरी पार हडबडून गेले आहेत. अनेक भागात भरलेल्या दाण्याची रोपे खाचरात आडवी झाली आहेत. यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे खुशीत असलेला शेतकरी,या अशा परतीच्या पावसामुळे आता भितीच्या सावटाखाली आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -