सुभाष म्हात्रे – अलिबाग
पनवेलच्या दक्षिणेस सोळा कि. मी. अंतरावर हिरव्यागार निसर्गाच्या सान्निध्यात गुळसुंदे नावाचे गाव असून, ते पाताळगंगा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेले आहे. याच नदीच्या तिरावर पेशव्यांचा सुभेदार रामजी महादेव यांनी श्रीसिद्धेश्वराचे मंदिर बांधले आहे. मंदिरासमोरच पाताळगंगा नदीकिनारी दीपमाळ नजरेत पडते. हे मंदिर फार प्राचिन असून, ते ७०० ते ८०० वर्षांपूर्वीचे आणि त्याचे बांधकाम दगडी स्वरुपाचे आहे. या मंदिरात श्रीशंकराच्या लिंगासह, पार्वतीदेवी आणि विविध देवदेवतांच्या मूर्ती आहेत. या प्राचिन मंदिराला भेट देण्यासाठी रायगड जिल्ह्यासह दुरवरून भाविक तेथील देवतांच्या दर्शनासाठी येत असतात.
एकीकडे हिरवागार डोंगर आणि दुसरीकडे बारमाही सतत वाहणारी पाताळगंगा नदी. या नदीच्या दुतर्फा असलेली हिरवीगार झाडे पाहता, तेथील निसर्गसौंदर्य प्रत्येकालाच आकर्षित करणारे असते आणि याच पाताळगंगा नदीच्या तिरावरील प्राचिन श्रीसिद्धेश्वराच्या मंदिरामुळे तेथे येणाऱ्या पर्यटकांसह भाविकांची मने प्रफुल्लित होत असतात. या मंदिरात श्रीशंकराच्या लिंगासह, पार्वतीदेवीची मूर्ती मूळ गाभाऱ्यात आहे. गाभाऱ्याबाहेर गणपती, श्रीविष्णू देवता, नंदी आणि हनुमानाची मूर्ती नजरेस पडते. या मंदिराच्या परिसरात गोपाळकृष्ण, श्रीराम, सीता, लक्ष्मण, भैरवनाथ, वज्रेश्वरी देवी यांचीही देवळे आहेत. त्यामुळे या धार्मिक स्थळाला भेट देताना बहुतांशी देवतांचेही दर्शन होते.
याठिकाणी भाविकांना राहण्याचीही व्यवस्था असून, फक्त राहण्यासाठी प्रत्येक माणसामागे पाचशे रुपये आकारले जातात. चहा,नाश्ता, जेवण लागल्यास स्थानिक ग्रामस्थ बनवून देतात. मात्र तेथे राहायला गेल्यानंतर पुजाऱ्याशी संपर्क साधून आगाऊ चहा,नाश्ता आणि जेवणाची ऑर्डर द्यावी लागते. याठिकाणी लघुरुद्र व अभिषेकासह सर्वप्रकारचे विधी होतात. उरण तालुक्यातील आवरे येथेही श्रीसिद्धेश्वराचे मंदिर असून, त्याचा दुसरा भाग पाताळगंगा नदीच्या तिरावर वसलेले श्रीसिद्धेश्वराचे हे मंदिर होय, असे पुजारी रामचंद्र पाटील यांनी ‘दैनिक प्रहार’ला माहिती देताना सांगितले.
श्रावणात श्रावणी सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. त्याचबरोबर अभिषेक, हरिनाम सप्ताह, नवरात्रीत नवरात्रौत्सव, महाशिवरात्रीला मोठा उत्सव, श्रीराम नवमीला उत्सव असे विविध कार्यक्रम येथे होत असतात. या कार्यक्रमात स्थानिक ग्रामस्थ मोठ्यासंख्येने सहभागी होत असतात. मुळचे छप्पर व घुमट दगडी असल्यामुळे अतिशय जड होते. त्याजागी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी नवीन छप्पर बांधले होते. आता पत्र्यांचे छप्पर आहे. जवळजवळ दीडशे वर्षांपूर्वी अशी एक वंदता उठली की, मंदिरातील मूर्तीने सिंहगर्जना केली. हा चमत्कार पाहण्यासाठी हजारो लोक गुळसुंद्यास आले होते. मंदिराच्या बाजूस विश्रामधाम असून, तेथे “महादेव सुत बाजी करमरकर यांनी सिद्धेश्वराच्या पायाशी अर्पण केले” असा मजकूर असलेला शिलालेख आहे. जवळच आनंद काशिनाथ जोशी यांनी १८६७ मध्ये लाकूड, विटांनी बांधलेले लक्ष्मी-नारायणाचे मंदिरही आहे.
या भागात फेरफटका मारला असता, २००६ ते २००८ मध्ये देऊळ परिसराचे जीर्णोद्धार केल्यानंतर रायगड जिल्हा परिषद अलिबाग योजना : आमदार महेश बालदी यांच्या जिल्हा वार्षिक योजना सन २०२२-२३ अंतर्गत गुळसुंदे श्रीशंकर मंदिर परिसर आणि रंगमंच करण्यासाठी ४४ लाख ५० हजार रुपये खर्च करण्यात आले. श्रीसिद्धेश्वर देवस्थानने काही नियम केले असून, त्यामध्ये मंदिर परिसरात चित्रीकरण, फोटो, तसेच विवाहापूर्वीचे फोटो काढण्यास एक दिवस अगोदर परवानगी बंधनकारक आहे. मंदिर परिसरात धुम्रपानास, मद्यपान करण्यास मनाई आहे. तसेच दशक्रिया विधीसाठी आलेल्या व्यक्तींना मंदिर परिसरात प्रवेश करण्यास मनाई आहे. नागरिकांना या मंदिर किंवा मंदिर परिसरात एखादा कार्यक्रम करावयाचा झाल्यास किंवा राहण्यासाठी खोली हवी असल्यास, अभिषेक, लघुरुद्रासाठी पुरोहित हवा असल्यास मंदिराचे पुजारी रामचंद्र पाटील यांच्याशी ८८३००२२३१० मोबाईल संपर्क साधावा.
गुळंसुद्याला कसे याल…
दिव्यावरून दीवा-रोहा शटलसेवा, दादरवरून दादर-रत्नागिरी रेल्वेने आपटा रेल्वे स्थानकात उतरून तेथून रिक्षाने १५ मिनिटांत गुळसुंदे गावात येता येते. खासगी वाहनाने पनवेल तालुक्यातील कोनफाटा रसायनीमार्गे गुळसुंदे गावी येता येईल. कल्याण व ठाणे येथून यायचे झाल्यास पनवेल एस.टी. बसस्थानकाजवळ उतरून पनवेल-आपटा एसटीने गुळसुंदे येथे येता येईल. अलिबाग, पेण, रोहा, माणगाव, श्रीवर्धन बाजूकडून यायचे झाल्यास आपटा फाट्यावर उतरून तेथे असलेल्या रिक्षाने गुळसुंदेला येता येईल.
खासगी वाहनाने आल्यास आपटामार्गे गुळसुंदे येते जाता येईल.खासगी वाहन किवा रिक्षाने थेट मंदिरापर्यंत जाता येते. मात्र मुख्य मार्गापासून मंदिराकडे जाणारा रस्ता लहान असल्याने वाहने हळू न्यावीत.