दीपक मोहिते
मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Assembly Elections 2024) तयारीच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. निवडणूक आयोगाचे (Election Commission) राजीवकुमार (RajeevKumar) हे आजपासून आपल्या पथकासह महाराष्ट्र दौरा करणार आहेत. या दौऱ्यादरम्यान निवडणूक आयोग राजकीय पक्ष व संबधित विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत ते बैठका घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा २६ ते २८ सप्टें.दरम्यान महाराष्ट्र दौरा आखण्यात आला आहे.या दौऱ्यात निवडणूक अधिकारी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील.
२६ सप्टें.रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईकडे रवाना होत आहेत.त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ सप्टें.रोजी सकाळी १०.०० वाजता निवडणूक मुख्य आयुक्त राजीवकुमार राज्यातील राजकीय पक्षांसोबत बैठक घेणार आहेत.त्यानंतर दुपारी १.०० वाजता सीईओ,नोडल अधिकाऱ्यांशी बैठक होणार आहे.त्याच दिवशी दु.३.०० वाजता निमलष्करी दलाचे अधिकारी,आयकर विभाग, गुप्तचर यंत्रणा,सीबीआय, ईडी अधिकाऱ्यांबरोबर बैठक आयोजित करण्यात आली आहे.
संध्याकाळी ५.०० वाजता राज्याचे मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालक यांच्यासह प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणेतील अधिका-यासमवेत बैठका होणार आहेत.या बैठकीत राज्यातील राजकीय व कायदा व सुव्यवस्थेविषयी आयुक्त आढावा घेतील. विधानसभा निवडणुकीसाठी आवश्यक पोषक वातावरण आहे का ? याबाबत आयोग उपस्थित अधिकाऱ्यांकडून माहिती घेणार आहेत. त्यानंतर २८ सप्टें.रोजी सकाळी साडे नऊ वाजता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांची बैठक होणार आहे.हे सर्व सोपस्कार पार पडल्यानंतर दु. ४.०० वाजता निवडणूक आयोगाचे अधिकारी पत्रकार परिषद घेतील.ही पत्रकार परिषद आटोपल्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीकडे रवाना होतील.या सर्व घडामोडीनंतर राजकीय पक्षांना आता आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असून जागावाटपाचा तिढा लवकरात लवकर सुटावा,यासाठी सर्व पक्ष कामाला लागले आहेत.
निवडणूक आयोगाच्या दौऱ्यानंतर येत्या चार ते पाच दिवसात निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगोलग आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे.दरम्यान राजकीय आघाडीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या असून शरद पवार गटात जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे.तर दुसरीकडे भाजपचे राष्ट्रीय नेत्याची राज्यात वर्दळ वाढली आहे.